कल्याण पश्चिममधून जिजाऊ विकास पार्टीच्या वतीने मोनिका पानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल !!
कल्याण, संदीप शेंडगे, दि. 25 - जिजाऊ विकास पार्टीच्या वतीने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोनिका पानवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांच्यासह शेकडो समर्थक यावेळी उपस्थित होते. जिजाऊची रणरागिणी मैदानात उतरत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या व जिजाऊ संघटनेच्या वतीने संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमिकरण, शेती क्षेत्रात भरीव कामगिरी सुरु आहे. या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातून अपक्ष लढून निलेश सांबरे यांना तब्बल अडीच लाखांचे मताधिक्य मिळाले. यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड येथून पहिल्या - दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळेच या मतदारसंघांसह कोकणातील १५ ते २० जागांवर जिजाऊ विकास पार्टीच्यावतीने विधानसभेसाठी उमेदवार उभे केले जात आहेत. "जिजाऊने आतापर्यंत केलेल्या विकासकामांच्या आधारे आम्ही जनतेपर्यंत जाणार असून कल्याण पश्चिमसह कोकणातील अनेक जागांवर जिजाऊ पार्टी निश्चित विजय संपादन करेल," असा विश्वास जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी व्यक्त केला. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता जनता नव्या पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळेच जिजाऊच्या उमेदवारीने विधानसभा निवडणुकीत आता रंग भरणार आहेत.
No comments:
Post a Comment