Thursday, 12 December 2024

** समाजसेवेसाठी झपाटलेली माणसे पदमुक्त होतात..कार्यमुक्त नाही

रुग्णसेवेचा वटवृक्ष...आरोग्यदूत मंगेश चिवटे

** समाजसेवेसाठी झपाटलेली माणसे पदमुक्त होतात..कार्यमुक्त नाही

   महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन संवेदशील मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची पुन्हा निर्मिती करून नव्याने सुरुवात केली. कोरोनाच्या काळात मंगेश चिवटे यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली होती. कोरोनातील कामगिरीमुळे त्यांना आरोग्यदूत म्हणत होते. त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. या वैद्यकीय मदत कक्षाची धुरा आरोग्यदूत रुग्णसेवक मंगेश चिवटे यांच्यावर सोपविली. तेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षधिकरी मंगेश चिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे काम दोन वर्षाच्या कार्यकाळात राज्यभरात सर्वदूर पोहचविले. जात धर्म, पंथ न बघता रुग्णांना अडचणीच्या काळात काळ वेळ न बघता वेळेत वैद्यकीय उपचारासाठी मदत दिली. राज्यातील सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दुर्धर आजारांसाठी (कर्करोग, मेंदुरोग, हृदयविकार, किडणी / यकृत प्रत्यारोपण) तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष असावा, अशी संकल्पना आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा मांडली होती; त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी ११ मार्च २०१५ मध्ये या संकल्पनेस मान्यता दिली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अस्तित्वात आला. जून २०२२ मध्ये शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाल्यानंतर शिवसेना- भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले. या महायुती सरकारच्या काळात राज्याचे तत्कालीन संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच वर्षामध्ये, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत, कक्ष प्रमुख मंगेश चिवटे कार्यरत असताना त्यांच्या निस्वार्थी टीमच्या साथीने एकूण ४१९ कोटी पेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले. यामुळे ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले (रुग्णांच्या मदतीसाठी एकुण ३८१ कोटी २० लक्ष रुपये, तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणुन ३८ कोटी ६६ लक्ष रुपये वितरीत करण्यात आले). गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कामकाज रोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दररोज सुमारे १२ तास सुरु असे. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी देखील कामकाज सुरू असे. अगदी सण-उत्सवाच्या काळात देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी काम केले. मंत्रालयाची वेळ बंद झाल्यावर देखील एकमेव मंत्रालयातील सातव्या मजल्यावर असलेले वैद्यकीय मदत कक्षाचे कार्यालय रुग्णसेवेसाठी सुरू असल्याचे अनेकांनी बघितले असून अनेकदा अनेक वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल ही घेतली आहे. त्यामुळे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या कार्यकाळात मंत्रालयात सुरू असलेले हे जरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष असले तरीही आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी त्याला राज्यातील गोरगरीब रूग्णांचे आरोग्य मंदिरच बनवले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत सर्वसामान्य रुग्ण डोळ्यासमोर ठेवून अनेक विविध बदल करत १०० टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये टोल फ्री क्रमांक ८६५०५६७५६७ सुरु केला. सोबतच रुग्णांना मंत्रालयात हेलपाटे घालावे लागु नये यासाठी Online Application प्रणाली सुरु केली गेली. (आता E-Mail व्दारे अर्ज स्विकारले जातात). मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये रुग्णालय अंगीकृत (Hospital Empanelment) प्रक्रिया तसेच या योजनेअंतर्गत रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपुर्णतः निःशुल्क/मोफत असल्याची जनजागृती केली गेली. ना वशिला, ना ओळख, थेट मिळते मदत हे ब्रिद वाक्य करुन हा कक्ष लोकाभिमुख बनवला. या योजनेच्या नावाखाली गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या दलालांची साखळी तोडण्यास आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या टीमला यश मिळाले. गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ऑनलाईन, पूर्णतः निःशुल्क आणि पारदर्शक केल्याने आता ही केवळ एक योजना राहिली नसून, ती लोकचळवळ करण्यात आरोग्यदूत मंगेश चिवटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना यश आले हे वास्तव आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याला मंत्रालयात नव्हे तर गावपातळीवरील रुग्णसेवकाशी केवळ संपर्क करावा लागत होता, ही सर्वात मोठी उपलब्धी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या कार्यकाळात करण्यात आली. आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या निकषातील आजारांची संख्या वाढवणे, निधीची/मदतीची मर्यादा वाढवणे, उत्पन्नमर्यादेची अट शिथील करणे, योजनेच्या लाभासाठी सुलभता आणण्यासाठी प्रक्रिया ऑनलाईन करणे, यांसारखे बदल करण्यात त्यांना यश आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अडीच वर्षात तब्बल ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ४१९ कोटी रुपयांची मदत वितरीत करता येणे, हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील हजारो निःस्वार्थ रुग्णसेवकांचे यश आहे असे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कक्षप्रमुख पदावरून मुक्त होताना प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात सांगितले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचा मोठा वाटा होता.मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची मदत केली आहे. यामध्ये आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात दौऱ्यावर असले किंवा कामात असले तरीही त्यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी कोणत्याही रुग्णाचा अर्ज गेला की ते लगेच सर्व काम बाजूला ठेऊन सर्वात प्रथम प्राधान्य ते रुग्णसेवेला देत असत, हे त्यांच्या कृतीमधून खूपवेळा दिसून आले आहे. तसेच अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला लागल्याचे दिसून आले होते. त्यावेळी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती. या सगळ्यामुळे मंगेश चिवटे यांनी स्वत:चेही एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कालही अगदी आरोग्यदूत मंगेश चिवटे सर पदमुक्त होत असताना आपल्याकडील पदभार रामेश्र्वर नाईक यांना देत असताना चिवटे सरांमधील दिलदार मंगेश यावेळी दिसून आला. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्यदूत मंगेश चिवटे सर हे जरी त्या पदावरून पदमुक्त झाले असले तरीही त्यांच्यामधील रुग्णसेवक कालही जिवंत होता, आणि आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असेल यात काही शंका नाही. आज जरी आदरणीय आरोग्यदूत मंगेश चिवटे सर पदमुक्त झाले असले तरी समाजसेवेसाठी झपाटलेली माणसे पदमुक्त होतात.. कार्यमुक्त नाही. हेच त्यांच्या रुग्णसेवेतून दिसून येत आहे. आज महाराष्ट्रभरातून मंगेश सरांसाठी ज्या काही सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत यातून मंगेश चिवटे सरांच रुग्णसेवेच कार्य किती लोकाभिमुख होत असे सांगायची कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष अस नाव जेव्हा कधी भविष्यात वाचनात येईल तेव्हा-तेव्हा फक्त एकच नाव सगळ्यांच्या नजरेसमोर असेल. ते म्हणजे आरोग्यदूत मंगेश चिवटे सर. महाराष्ट्राला या कक्षाची खरी ओळख मंगेश सरांनी करून दिली. याच सर्व श्रेय त्यांचच आहे.आरोग्यदूत मंगेश चिवटे सर यांच्या कार्याला सलाम.!

केतन दत्ताराम भोज
कार्यकारिणी सदस्य - मराठी वृत्तपत्र लेखक संघ,मुंबई 
भ्रमणध्वनी - ८८७९५४४५४०

No comments:

Post a Comment

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान ! ** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे ...