महापुरुषांच्या स्मारकांच्या कामाला गती द्या आमदार दिलीप लांडे यांची विधानसभेत मागणी !!
** चांदिवलीतील विविध समस्यांवर अधिवेशनात उठवला आवाज
मुंबई, (केतन भोज) : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमावादातून कर्नाटकात मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात केंद्र सरकारने मराठी माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी करतानाच चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या कामाला गती द्यावी तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि संत ककय्या महाराज यांची स्मारके उभारण्यात यावीत, अशी विनंती राज्य सरकारला केली. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना दिलीप लांडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान आवास योजनेतून 4,475 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सिडकोच्या माध्यमातून ६७ हजार घरे बांधून देण्यात येणार आहेत. पण त्याचवेळी एमएमआरडीएने 2008 - 09 मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या इमारती राहण्यास योग्य नसल्याकडे लक्ष वेधून क्रांती नगर, संदेश नगर आणि जरीमरी या मिठी नदीच्या पात्रातील धोकादायक ठिकाणच्या प्रकल्पबाधितांना हक्काची घरे देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दिलीप लांडे यांनी केली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने ग्रामीण भागात घरगुती जोडणी देण्यात येत आहेत. पण चांदिवली मतदारसंघात अंबिका नगर, वाल्मिकी नगर, अशोक नगर, राजीव नगर या डोंगराळ भागात पाणी मिळत नसल्याने भूमिगत टाक्या देण्यात येऊन अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ही लांडे यांनी केली. नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन डोंगराळ भागातील धोकादायक वस्त्यांची पाहणी करून या लोकांना सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी दिलीप लांडे यांनी केली.
No comments:
Post a Comment