"सह्याद्रीचा प्रतिकैलास श्री क्षेत्र मार्लेश्वर"
मार्लेश्वर देवालय (मठ)आंगवली व मारळचे श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान येथे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन !
** लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वरला लागले विवाहचे वेध
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मार्लेश्वराचा यात्रौत्सव जवळ आला असून आत्तापासूनच सह्याद्रीला यात्रेचे आणि मार्लेश्वराला विवाहाचे वेध लागले आहेत चहू बाजूनी आकाशाला गवसणी घालणारे उंच ताशीव कडे आणि त्यावर बहरलेली गर्द वनराई, बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा असे निसर्गाचे अलौकिक सौदर्य लाभलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर देवाचा यात्रौत्सव १३ व १४ जानेवारी २०२५ ला साजरा होणार होत आहे.कोकणातील श्री मार्लेश्वर या जागृत देवस्थानाविषयी थोडक्यात माहिती....!
महाराष्ट्राचं वैभव असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचं श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे. वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर्गाचा अविष्कारच! त्यातच मार्लेश्वर म्हणजे नागमोडी पर्वतरांगा जणू निसर्ग सागरावर उमटणा-या सोनेरी लाटाच! या निर्जन, निरव शांतता असलेल्या अरण्यात अध्यात्मिक उपासकांसाठी अभंग शांतता भरून राहिली आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे योग साधकास अध्यात्मिक साधनेसाठी एक उत्कृष्ट तपोवनच आहे.
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे १५ कि. मी.आणि आंगवली या गावापासून ११ कि. मी. अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी असलेलं हे पवित्रआणि जागृत देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. नैसर्गिक दृष्टय़ा अतिशय विलोभनिय असणा-या या ठिकाणी माणूस अक्षरश: हरवून जातो. भोवतालच्या रमणीय परिसराचा व हिरव्यागार वनश्रीचा आस्वाद घेण्यात दंग होतो. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’ त्यामध्ये बारमाही ओतणारा ‘धारेश्वर’ धबधबा. तसेच लतावेलींची सोबत आणि पक्ष्यांचे कुंजन प्रसन्नतेला वरदान आहे. पावसाळ्यात किंवा पावसाळा संपता संपता श्री क्षेत्र मार्लेश्वरला भेट देण्याची मजा आणखीनच वेगळी असते.
श्री क्षेत्र मार्लेश्वर बसस्थानकापासून पुढे अरुंद नागमोडी सिमेंटच्या पाय-यांची पक्की पायवाट आहे. घनदाट जंगल, खाली खोल दरी, माथ्यावर सह्याद्रीची शिखरं पाहत असताना अनोख्या विश्वात कधी पोहचतो, याचे भानच राहत नाही. देवळाचा साडेतीन फुटी दरवाजा व गाभारा गुहास्वरूपाचा असून तो सुरक्षित आहे. एकावेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकते किंवा बाहेर येऊ शकते. गाभा-यात मात्र २५ माणसं उभी राहू शकतात. ही गुहा पांडवकालीन असल्याचे जनमत आहे. गाभा-यात शंकराची स्वयंभू पिंड आहे. सोबत पाण्याचे कुंड असून खोळवर गेलेली विवरं आहेत. याठिकाणी विविध प्रकारचे साप व नाग मुक्तपणे संचार करताना दिसतात.
मात्र ते कोणालाही इजा करत नाहीत. वाटेत वानरांची खोडकर वानरसेना हसत खिदळत मन रिझवतात. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, पत्रकार, स्वयंसेवक श्री क्षेत्र मार्लेश्वर ट्रस्ट, मारळ ग्रामपंचायत व अन्य समिती पदाधिकारी, सदस्य, पोलिस यंत्रणा प्रयत्न करत असतात. येणा-या-जाणा-या भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून दक्षता घेतली जाते. शिवाय स्वच्छता राखण्याचे कामही चोख बजावले जाते. अनेक सुखसोई उपलब्ध करून देण्यासाठी समितीतर्फे कार्यकर्ता झटत असतात.
मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी याठिकाणी र्वषभर रिघ असते. शालेय सहली याचठिकाणी मोठय़ा प्रमाणात येत असतात. दर महिन्याच्या सोमवार व शनिवार तसंच सुट्टीच्या दिवशी व श्रावण महिन्यात, महाशिवरात्री, दत्तजयंती या दिवशी तर भाविकांचा महासागर लोटतो. जानेवारी महिन्यात तर येथे खूपच गर्दी असते. कोकणवासीय चाकरमान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वरचा जत्रौत्सव असतो. १३ जानेवारी २०२५ ते १४ जानेवारी २०२५ दरम्यान होणा-या या जत्रोत्सवाला लाखो भाविक हजेरी लावतात. पूर्वी मारळ,आंगवली या गावांना फारसं कोणी ओळखत नव्हतं. परंतु आज मारळ-आंगवली म्हणजे मार्लेश्वर व मार्लेश्वर म्हणजे आंगवली-मारळ होय.या यात्रेसाठी भाविक पायी, सायकल व इतर खाजगी वाहने, एस.टी. बसेसने येत असतात. मुंबई येथून अनेक भाविक ग्रुपने बस करून यात्रेसाठी जातात. परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल, ठाणे, बोरिवली याठिकाणाहून तसेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, साखरपा, देवरूख, संगमेश्वर, सावंतवाडी याठिकाणाहून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे एस.टी.ची सोय केलेली असते.दरवर्षी मकर संक्रांतीला तेथे होणारा कल्याणविधी म्हणजेच मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात.मारळ-आंगवली मध्ये या काळात दिवाळी साजरी होत असते. अंगणात रांगोळी, दरवाजावर तोरण, रंगरंगोटीही करून येणा-या-जाणा-या भाविकांचे, नातेवाईक यांचे स्वागतच केले जाते. हजारो गाडय़ा ये-जा करत असतात. सारा परिसर ‘हर हर महादेवऽऽऽ..’, ‘हर हर मार्लेश्वरऽऽऽ..’ या जयघोषाने दुमदुमत असतो. आंगवली गावांमध्ये असणारे माल्रेश्वर देवालय (मठ)व मारळचे श्री क्षेत्र माल्रेश्वर देवस्थानचे पावित्र्य जपणे प्रत्येकाच्या हाती असते.कारण ही दोन्ही मंदिरे वैशिष्टय़पूर्ण आहेत. याठिकाणी येणारे भाविक मद्यपान करून येऊ शकत नाहीत. शिवाय मांसाहार केलेलाही चालत नाही. महिलांनी आपल्या अडचणीत याठिकाणी येऊ नये असा संकेत आहे. ज्यांनी या बाबींचा विचार केला नाही, त्या-त्या वेळी नैसर्गिक आपत्ती वा अपघात झाले असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितले जाते.
मकर संक्रातीला पारंपारिक पद्धतीने मार्लेश्वर देवाचा विवाह संपन्न होणार आहे.या समारंभासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आदल्या दिवशी सह्याद्रीच्या कडेकपारीत दाखल होतात यासाठी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरु झाली असून आंगवली येथील श्रीदेव मार्लेश्वर आणि कोंडगावची गिरजादेवी यांच्या विवाह सोहळ्यास विशेष महत्व असते यास कल्याण विधी असे म्हणतात सनई चौघड्याच्या सुरात पारंपारिक विधिवत मंगलमय वातावरणात शिवशंभोचा गजर करीत विवाह सोहळा पाहण्यासाठी प्रचंड जनसागर लोटतो.मानपान वीडे भरणे,मुलगी दाखविणे, पसंती हळद लावणे, उतरणे, आंतरपाट मंगलाष्टके यासारखे हिंदू धर्मात लग्नासाठी पारंपारीक विधी होतात तेवढे विधी या देवांच्या लग्नसोहळ्यात केले जातात.
मार्लेश्वराचे मूळ आंगवलीच्या मंदिरात असल्याने तेथेही आकर्षक रोषणाई, सजावट केली जात असून सध्या या मंदिरात जोरदार तयारी सुरु असून मानकरीही आपल्या कामात मग्न आहेत.दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत करोडो रुपयांची उलाढाल होते त्यासाठी तात्पुरते मंडप घालण्याच्या कामाला सुरुवात झाली असून श्री मार्लेश्वर देवस्थान रिलीजस अँन्ड चॅरिटेबल ट्रस्ट आंगवली मंदिर पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.यानिमित्ताने आंगवली देवालय(मठ )येथे विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले असून सध्या मार्लेश्वर नगरीत विवाहाचे वारे वाहू लागले आहेत.
श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील धारेश्वर धबधब्याखाली प्रत्येक भाविक (पुरुष-महिला, युवक- युवतीवर्ग) एकत्रितपणे स्नान करून शुचिर्भुत होऊनच मार्लेश्वराचे दर्शन घेतात. येथे स्नान करणे हा एक अनोखा आनंदच! वर्षासहलीसाठीही येथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात.आपणही एक वेळ येथील जत्रौत्सवाचा किंवा मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचा अनुभव घ्यावा. येथील निसर्ग सौंदर्य, धारेश्वर धबधबा आपणास येथे पुन्हा पुन्हा येण्यास उद्युक्त करते. कारण हे मार्लेश्वर देवालय (मठ)आंगवली व श्री क्षेत्र मार्लेश्वर ग्रामदैवत(मारळ ) तितक्याच निसर्गरम्य गावात वासलेले असून मनाला ओढ लावणारे, स्मृतिचिरंतन करणारे, गतकाळाला उजाळा देणारे नव्हे तर पुन्हा-पुन्हा पाहातच राहावे असेच आहे. एकवेळ आपणही आमच्या या गावाला श्री क्षेत्र मार्लेश्वरला अवश्य भेट देऊन आनंद लुटावा...!
‘हर हर महादेवऽऽऽ..!!’ ‘
हर हर मार्लेश्वरऽऽऽ..!!’
शांत्ताराम गुडेकर
मु. पो. आंगवली (रेवाळे वाडी )
मा. विशेष कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्र शासन
दै. अग्रलेख
मुंबई /कोकण विभागीय संपादक
हर हर मार्लेश्वर 🙏
ReplyDeleteहर हर मार्लेश्वर
ReplyDeleteहर हर मार्लेश्वर
ReplyDelete