भिवंडी पालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रावरील साहित्याचे वितरण !
भिवंडी, (प्रतिनिधी) मिलिंद जाधव
भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा व पोलिस प्रशासन सज्ज झाले असून २३ प्रभागातील ९० सदस्य निवडीसाठी होत असलेल्या मतदाना साठी शहरात ७५० मतदान केंद्र असून यापैकी १५३ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ८२० मतदान यंत्र तर १६४० इव्हीएम असणार आहे. मतदारांना मतदानावेळी सावली मंडप, पिण्याचे पाण्याची व्यवस्था तसेच ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग यांचेकरिता डोली व व्हिलचेअरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र असलेल्या इमारतींमध्ये मुख्य वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करण्यात आली असून, आशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एक वैद्यकीय पथक, अँब्युलससह तैनात करण्यात आले आहे. शहरामध्ये मुस्लीमबहुल भागातील मतदान केंद्रावर पर्दानशीन महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी ३५० महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडणूकीकरिता एकूण ४५०० कर्मचाऱ्यांची तर १०० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या २६८ महिला कर्मचारी या अन्य शहरातून येणार असल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था देखील महानगरपालिकेने केली असल्याची माहिती मनपा निवडणूक विभागाने दिली आहे. शहरातील पाच ठिकाणी नेमण्यात आलेल्या सात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना बुधवारी साहित्य वितरण केले गेले.मतदान केंद्रावरील पथकासह एक पोलिस व एक होमगार्ड सुद्धा दिला जात आहे.एकूणच शहरातील मतदान शांततेत व निःपक्षपणे पार पडण्यासाठी यंत्रणा सज्ज असून संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोन कॅमेरा व सी. सी. टीव्ही ही तैनात करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment