Sunday, 4 January 2026

परेरा नगर येथील श्रीमती द्रोपदाबाई जगदीश इंदिसे विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न !!

परेरा नगर येथील श्रीमती द्रोपदाबाई जगदीश इंदिसे विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न !!

ठाणे, प्रतिनिधी :
परेरा नगर, पाडा नं. ३, लोकमान्य नगर येथील श्रीमती द्रोपदाबाई जगदीश इंदिसे विद्यामंदिर येथे रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय उषा संजय इंदिसे मॅडम होत्या या मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपला मौल्यवान वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या घंटानादाने करण्यात आली. त्यानंतर परिपाठ घेण्यात आला. परिपाठानंतर काही इच्छुक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी, शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता तसेच शाळेशी असलेली आपुलकी आपल्या शब्दांत व्यक्त करत सर्व शिक्षक व उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मनोगत सादर केले. या मनोगतांमुळे संपूर्ण वातावरण भावनिक झाले आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

यानंतर शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी माजी विद्यार्थ्यांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत केलेली प्रगती, त्यांच्यातील जिव्हाळा आणि शाळेशी असलेली नाळ कायम ठेवण्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमात शिक्षकांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम म्हणून एक छोटासा खेळ आयोजित करण्यात आला. या खेळामध्ये सर्व शिक्षकांनी उत्साहाने व मनापासून सहभाग घेतला. या उपक्रमामुळे शिक्षक व माजी विद्यार्थ्यांमधील आपुलकी अधिक दृढ झाली आणि कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याला घडवणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आणि संस्कार देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा मेळावा केवळ एक कार्यक्रम न राहता, नात्यांचा उत्सव ठरला.
आठवणींना उजाळा देणारा आणि शाळेशी असलेली नाळ अधिक घट्ट करणारा हा उपक्रम सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...