चिरनेर येथील प्रयोगशील शेतकरी गोपाळ केणी यांचे निधन !
उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) ::उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथील प्रयोगशील शेतकरी गोपाळ सोमा केणी (८४) यांचे सोमवारी १२ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजताचे सुमारास वृद्धपकाळाने (कातळपाडा) येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार तथा उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जीवन केणी यांचे ते पिताश्री होते.१९५४ मध्ये सातवी उत्तीर्ण असलेल्या गोपाळ केणी यांना त्याकाळी नोकरीची संधी असताना देखील त्यांना घरची शेती व पशुधन सांभाळावे लागले. त्यानंतर ते शेतीतच रमले. उत्तम, कष्टाळू व प्रयोगशील शेतकरी म्हणून ते पंचक्रोशीत सुपारीचित होते.
भातशेतीबरोबर कडधान्य पिकाची शेती, बागायती शेती व मळ्याची शेती मोठ्या कष्टाने व मेहनतीने पिकवून त्यांनी आपल्या संसाराचा गाढा ओढला. पशुधनावर त्यांचे जीवापाड प्रेम असल्यामुळे त्यांची निगा राखण्याचे काम त्यांनी उत्तम केले. संसाराचा रात्रंदिवस गाढा ओढत असताना, मुलांना शिक्षण व चांगले संस्कार दिले. उत्तम आचारी म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या आवाजात चांगला गोडवा असल्यामुळे लग्न सोहळ्यात मंगलाष्टके सादर करण्याचा मान त्यांना दिला जात होता. चिरनेर - कातळपाडा रंगभूमीची सेवा करण्यात देखील त्यांचे योगदान आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा नातेवाईक व ग्रामस्थांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत चिरनेर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, दोन सासुरवाशीण कन्या, नातवंडे व पंतवडे असा आप्त परिवार आहे.
No comments:
Post a Comment