*" राजभवन आयोजित ; **चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचा यशस्वी सहभाग " !!
मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रा. सुशिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल यांच्या नियोजनाने रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा संघ शेठ जे.एन. पालीवाला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित केलेल्या आंतरविद्यापीठ आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला होता. या शिबिरात महाराष्ट्र राज्यातील २४ विद्यापीठ व ३६ जिल्ह्यातून १०४८ विद्यार्थी व ८७ संघनायक कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते.
शिबिराचा मुख्य उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जाणीव निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देणे तसेच स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जाणीव, शिस्त व राष्ट्रीय मूल्ये रुजविणे हा होता.
आव्हान शिबिरात सहभागी झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना राष्ट्रीय आपदा निवारण बल (NDRF) च्या जवान व अधिकाऱ्यांनी सलग आठ दिवस बचावकार्य, आपत्कालीन परिस्थितीत, प्रतिसाद, प्राथमिक उपचार, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, तसेच आपत्ती काळातील योग्य व्यवस्थापन याबाबत सखोल प्रशिक्षण दिले.तसेच तज्ञ मार्गदर्शकांकडून आपत्ती व्यवस्थापन विषयक व्याख्यानाच्या माध्यमातून ज्ञान दिले.
आव्हान आपत्ती व्यवस्थापन शिबिरातील सांस्कृतिक मिरवणुकीत रायगड जिल्ह्याच्या संघाने पारंपरिक बाल्या नृत्य सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच प्रमाणे मुलींनी कोळी नृत्य सादर करून रायगडच्या लोकसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले. मिरवणुकीच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेतील दोनच राजे इथे गाजले ही नाटिका सादर करून स्वराज्य, न्याय, समता, बंधुता व समानतेचा प्रभावी संदेश दिला. या सादरीकरणाची दखल घेवून आयोजकांनी ३६ जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याच्या संघाची निवड करून प्रतिष्ठेचा समजला जाणारा सर्वोत्तम मिरवणूक पुरस्कार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद रामराव गडाख यांच्या शुभहस्ते शिबिराच्या समारोप कार्यक्रमात रायगड जिल्ह्या संघाला प्रदान केला.
या शिबिरासाठी रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक व कार्यक्रम अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच सी. के. टी. महाविद्यालय, पनवेल व शेठ जे.एन.पालीवाला महाविद्यालय पाली-सुधागड यांचे विशेष सहकार्य लाभले. रायगड जिल्ह्याच्या आव्हान शिबिरातील कामगिरीची दखल घेवून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. रविंद्र कुळकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ . प्रसाद कारंडे यांनी रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचे कौतुक व अभिनंदन केले.
सौजन्य/प्रसिद्धी करिता - अश्विनी निवाते
No comments:
Post a Comment