आई-वडिलांप्रती सदैव प्रेमाची भावना ठेवा : महेंद्रशेठ घरत
**पनवेलच्या वधू-वर परिचय मेळाव्याला उदंड प्रतिसाद
उरण दि २७,(विठ्ठल ममताबादे) : "आई-वडिलांची सेवा केली आणि त्यांच्याप्रती सदैव प्रेमभावना ठेवली तर आयुष्यात काहीही कमी पडत नाही, हे मी स्वानुभवावरून सांगतो. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखद प्रसंग आहे. लग्नानंतर एकमेकांना समजून-उमजून घेणे ही कला आहे. आमचे मोठे कुटुंब होते, पण पत्नी शुभांगीने आई-वडिलांना आणि मला दिलेली साथ कल्पनातीत आहे. त्यामुळेच मी आज जगाच्या कानाकोपऱ्यांत बिन्धास्त फिरतो. आताची तरुण पिढी उच्च शिक्षण घेतलेली आहे; परंतु उच्च शिक्षणाच्या वाढत्या प्रमाणामुळे मुला-मुलींचे लग्नाचे वय तिशीच्या पुढे चालले आहे. त्यामुळे वेळेवर लग्न होणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी वधू-वर परिचय मेळाव्याची कल्पना उत्तम आहे. बारा बलुतेदारांसाठी विशेषतः भूमिपुत्रांसाठी दिबांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्याच पुढाकाराने सुरू झालेला वधू-वर परिचय मेळावा गेली सुमारे ३० वर्षे पनवेल-उरण आगरी समाज मंडळ आयोजित करीत आहे. हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे या मंडळाच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत पनवेल येथे म्हणाले. रविवारी (ता. २५) आगरी वधू-वर परिचय मेळावा पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
.
यावेळी दिबांचे पुत्र अतुल पाटील म्हणाले, "आम्ही वधू-वर मेळावा दरवर्षी आयोजित करतो. त्यात कुणाला फसविण्याचा, लुटण्याचा आमचा धंदा नाही. अतिशय उदात्त भावनेने गेली ३० वर्षे आम्ही काम करतोय. वधू-वर मेळाव्याद्वारे अनेकांची लग्न जमलेली आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये."
पनवेल येथील आगरी समाज सभागृहात वधू-वर मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. ३०० वधू-वर आणि ५०० पालकांनी उपस्थिती लावली. त्यांना पनवेल-उरण आगरी समाज मंडळाने स्नेहभोजनही दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी नगरसेवक जगदीश गायकर, भिंगारीचे माजी उपसरपंच संजय गायकर, मेघा तांडेल, बी. पी. म्हात्रे, ए. बी. पाटील, स. क. पाटील गुरुजी, दत्तात्रेय जाधव, काशिनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजय गायकर यांनी सुंदर असे सूत्रसंचालन केले, तर जे. डी. तांडेल यांनी प्रास्ताविक केले.
No comments:
Post a Comment