Saturday, 28 February 2026

उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात मराठी भाषा दिन साजरा !!

उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात  मराठी भाषा दिन साजरा !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात  जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर  यांच्या संकल्पनेतून एमपीएससी यूपीएससी सीए परीक्षा पोलीस भरती यांची  अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मराठी भाषा गौरव दिन प्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार व एडवोकेट निरंतर सावंत  यांनी मराठी भाषेबद्दल मनोगत व्यक्त केले. निरंतर सावंत यांनी मराठी भाषा जास्तीत जास्त बोलणे व ती भाषा जिवंत ठेवणे हे आपल्या सर्व मराठी लोकांचे कर्तव्य आहे तर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी सर्वांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठविणे जरुरीचे आहे याचे कारण सेमी इंग्रजी माध्यमाद्वारे गणित , विज्ञान, इंग्रजीमध्ये शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तसेच मराठी माध्यम असल्यामुळे मराठी विषय, मराठी व्याकरण समल्यामुळे वाचनाची गोडी त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज यांचे अजरामर असलेले वाड्मय समजून घेता येईल आणि ते समजल्यामुळे विचारांची प्रगल्भता आणि त्यामुळे चौफेर व्यक्तीमत्व विकसित होण्यास मदत होते. याउलट आपण दुर्लक्ष केल्यामुळे मोडी लिपी व संस्कृत भाषा कशी लोक पावली याची त्यांनी उदाहरणे दिली. जी ८० व ९० वर्षांपूर्वीची जुने मोडी लिपीतले जुने सरकारी दस्ताऐवज वाचण्यासाठी आता माणसं उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ते काय लिहिले आहे त्या लिखाणाच्या अर्थाचे आकलन होत नाही त्यामुळे भाषा बोलणे ती टिकवणे व आपल्या मातृभाषेतील संवाद आपण आपल्या स्वतः पासूनच वाढवणे हे प्रत्येक नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या विषयावर चर्चा करून, विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. अशा प्रकारे उरण नगरपरिषदेचे माॅंसाहेब  मिनाताई ठाकरे वाचनालयात, मराठी भाषा दिन यशस्वी साजरा करण्यात आला.त्याबद्दल उपस्थितांचे वाचनालयचे कर्मचारी जयेश वत्सराज यांनी आभार मानले.

लोकनेते दि. बा . पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन !!

लोकनेते दि. बा . पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : लोकनेते दि. बा . पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून जो लढा गेली ४ वर्षांपासून लढा चालू आहे तो म्हणजे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यायला हवे.महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला  नावाच्या पाठवलेल्या प्रस्तावाबाबत अजून कुठलीच सकारात्मक चर्चा नाही म्हणुन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इथल्या स्थानिक नेत्यांना व मंत्रिमंडळाला सांगण्यासाठी  धरणे आंदोलन हे आझाद मैदान याठिकाणी घेण्यात आले. लवकरच मोठया आंदोलनाची तयारी चालू आहे व पुढील नियोजन लवकरच घेण्यात येईल. असे यावेळी ठरविण्यात आले. 

या वेळी आझाद मैदान मध्ये कृती समिती अद्यक्ष दशरथ दादा पाटील, भूमिपुत्र नेते व लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे , कृती समिती सद्यस्य व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संतोष घरत, पनवेल चे माजी उपमहापौर जगदीश भाई गायकवाड, कृती समितीमधील अन्य सदस्य व मुंबई  रायगड मधून आलेले सर्व आगरी कोळी बांधव व सर्व समाजबांधव उपस्थित होते. रायगड जिल्हा व मुंबईला जोडणाऱ्या महत्वाचा सागरी मार्ग असलेल्या अटल सेतूचा मार्ग अडवून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला

मराठी भाषेने मराठी माणसाला स्वाभिमानाचा ताठ कणा दिला आहे.- साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

मराठी भाषेने मराठी माणसाला स्वाभिमानाचा ताठ कणा दिला आहे.- साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण एसटी डेपोमध्ये मराठी भाषा दिन साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पासून कुसुमाग्रज आणि आजच्या लहान मोठ्या लेखकांनी मराठीला समृद्ध केले आहे.मराठी भाषेचा स्वाभिमानाचा ताठ " कणा " जगण्यासाठी दिला आहे.तसेच पाटील यांनी "माय बोली "" "सारेबाराचा पलाट " आगरीबोलीत कविता सादर केल्या.

    दुसरे वक्ते कवी संजीव पाटील यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवनावर विचार मांडून आपल्या कविता सादर केल्या. विशेष म्हणजे प्रवासाची निघालेल्या प्रवाशांनी ही मनसोक्त ऐकून भरपूर दाद दिली.

        कार्यक्रमाला अधिक्षिका दीपा कोंढारकर,विभागिय नियंत्रक तुषार शिंदे, तानाजी भोईर,रोहन खलिपे, चंद्रकांत देसले, संतोष दळवी,संदिप चौहान, प्रभाकर म्हात्रे,पंकज म्हात्रे इत्यादी प्रमुखांची लक्षणीय उपस्थिती होती

जवाहरलाल नेहरू विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा !!

जवाहरलाल नेहरू विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा !!

** सुलेखनकार मनोहर जामकर यांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष. 

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अगदी शाही थाटात झाली मनोहर टेमकर  आणि विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विद्यालयाच्या लेझीम पथकाच्या सादरीकरणाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सुप्रसिद्ध सुलेखनकार मनोहर जामकर  यांच्या शुभहस्ते लाल फीत कापून सुलेखन प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या स्वागताचा फलक किशोर म्हात्रे यांनी अत्यंत सुंदर आणि मोहक अक्षरात रेखाटला होता जो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. 

   या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध सुलेखनकार मनोहर जामकर यांचे सुलेखन (कॅलिग्राफी)प्रदर्शन ठरले. जामकर यांनी विद्यार्थ्यांना अक्षरांचे सौंदर्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवले ज्यामध्ये विद्यार्थी पूर्णपणे रमून गेले होते. 

    याप्रसंगी शालेय प्रशासकीय अधिकारी मोनिका रतनपर्ज,पालक संघाचे उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे, अविनाश म्हात्रे सहसचिव योगेश तांडेल आणि पत्रकार तृप्ती भोईर उपस्थित होत्या .विद्यालयाचे मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील ,इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव, अंकुश जोगळे आणि बालोद्यान विभागाच्या  मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे , पर्यवेक्षक जगदीश मढवी  ,चंदा टेमकर  व सहकारी शिक्षकांच्या अचूक नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला. 

     नववी इयत्तेतील स्वराने गोड आवाजात ईशस्तवन सादर केले. तर सातवीच्या विद्यार्थ्यांनी सतीश गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली 'माऊली' या मराठमोळ्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर केले . सुलेखनकार मनोहर जामकर यांनी सुलेखनावर आधारित चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी मयूर सरांनी तांत्रिक मदत केली. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या शिक्षिका सरोज भामरे यांनी केले. तर राजेंद्र ठाकूर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्रजी व मराठी माध्यमांचे मुख्याध्यापक समस्त शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, वसंत कडू, शिवाजी गुरव ,शितल दर्णे आणि दिलीप घरत  या सर्वांच्या सुंदर समन्वयातून 'मराठी राजभाषा' दिन सोहळा सुवर्ण अक्षराने कोरला गेला. प्रत्येकाने दिलेल्या योगदानामुळेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली,आणि कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा !!

यु. ई. एस. स्कूल,  ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कवी, जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस सर्वत्र मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये मराठी दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रम सुरु होण्याआधी, मराठी दिवसानिमित्त विदयार्थ्यांनी रोजची प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्यगीत व दिवसाच्या ठळक बातम्या मराठीत म्हटल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, उदयोजक  गणेश भगवान नाखवा, यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका यांचे विदयार्थ्यांनी लेझिम नृत्य करुन ढोलताश्यांच्या गजरात स्वागत केले तसेच प्रमुख पाहुण्यांचे व सर्व मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन गणपती, सरस्वती, ज्ञानेश्वरीचे व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

  त्यानंतर शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी व्यासपीठांवरील सर्व मान्यवरांसोबतच पीटीए मेंबर, पालक, शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक विभागातील विदयार्थ्यांनी स्वागतगीत गायले व माध्यमिक विभागातील शिक्षिकेने मराठी दिवसाचे महत्व सांगितले. त्यानंतर स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या  सिमरन दहिया ह्यांनी सर्वांना मराठी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर ह्यांनीही मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले तर प्रमुख पाहुणे गणेश भगवान नाखवा ह्यांनी आपल्या मनोगतातून मराठी दिवसाची महती व उदयोजक क्षेत्रातील अनुभव विदयार्थ्यांना सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमात प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले.  माध्यमिक विभागातील विदयार्थ्यांनी शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिके तसेच कोळीनृत्य सादर केले.  तर उच्च महाविदयालयातील विदयार्थ्यांनीही सोशल मिडीया ह्या विषयावर आधारीत पथनाट्य सादर केले. त्यानंतर उपस्थित सर्व विदयार्थ्यांनी कृतीगीत सादर करुन सर्वांची मने जिंकली.मराठी दिवसानिमित्त सर्वांसाठी मराठी पुस्तकांचे प्रदर्शन मांडले होते व मराठी महिने रांगोळीद्वारे साकारले होते, तसेच कोळी समाजातील पारंपारिक सण व प्रथांचे दर्शन सुंदर अशा देखाव्यातून सादर केले होते. उपस्थित सर्वांनी ह्या प्रदर्शनाचा मनापासून लाभ घेतला.कार्यक्रमाची सर्व तयारी, उपस्थितांचं स्वागत व सुत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन माध्यमिक विभागातील विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी सूत्रबद्ध पद्ध्तीने केले.कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला. अशा रितीने यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये मराठी राजभाषा दिवस आनंदात व उत्साहात साजरा झाला

क्रिकेट खेळामुळे तरुणांचे भवितव्य अंधारात ; क्रिकेट मुळे तरुणाई मूळ मुद्द्यापासून भरकटली !!

क्रिकेट खेळामुळे तरुणांचे भवितव्य अंधारात ; क्रिकेट मुळे तरुणाई मूळ मुद्द्यापासून भरकटली !!

** अभ्यास व करिअर कडे क्रिकेट मुळे दुर्लक्ष - आई वडिलांना लागली मुलांची चिंता.

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. याचा प्रत्यय आता रायगड जिल्ह्यात सर्वत्र येत आहे. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते मात्र रायगड मधील क्रिकेट खेळाडूना कोणतेही मर्यादा नसल्याचे दिसून येत आहे.रायगड जिल्ह्यातील तरुण क्रिकेटच्या नादी लागून भरकटल्याने त्याची झळ आतापासूनच जाणवू लागली आहे.मानवी जीवनात सर्वच खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळ खेळत खेळीडू वृत्ती जपली पाहिजे. विविध खेळांतून तरुण राज्य, देश विदेशात प्रतिष्ठा, पैसा कमावतात हे अभिमानास्पद आहे. याच खेळ प्रकारांतील क्रिकेटने आता मैदानांसोबत शेत, माळरान, गल्लीबोळाची जागा घेतली आणि अगदी  लहानग्यांपासून वयस्कर लोकही क्रिकेट खेळत गुंतून गेलेत हे आनंदाचे आहे. दुसरीकडे गाव, वाडीपाड्यांतील अनेक तरुणांवर क्रिकेटच्या अतिवेडाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. सर्वत्र क्रिकेटच्या जीवघेण्या स्पर्धा सुरू झाल्या. पूर्वी सुट्टीच्या शनिवारी, रविवारी होणारा क्रिकेट सामना आता आठवड्यातील एकही वार सोडत नाही. त्यातून क्रिकेटच्या मायाजाळात तरुण कधी गुरफटला गेला कळलेच नाही हेच वास्तव जिल्हा, सर्व तालुक्यातून दिसून येत आहे. शहर, ग्रामीणातील तरुणाईला क्रिकेटने अक्षरशः विळखा घातला. अतिवेडाने अनेक  तरुणाईतल्या प्रखर ईच्छाशक्ती, महत्त्वकांक्षेचा बळी घेतला, स्वप्नांवर मुरड आली. जणूकाही क्रिकेटचा अतिवेड तरुणांच्या  करिअरवर घाला घाततो की काय ? असेच धाडसाने बोलावे लागेल. कंपन्यांत नोकरी, पगाराबाबत मर्यादीत महत्त्वकांक्षा, लहानशा कमाईवर समाधान मानणारा तरुण क्रिकेटच्या अतिवेडातून बाहेर येण्याचे नाव घेत नाही. क्रिकेट मुळे तरुण वर्ग बेभान झाला आहे. तरुणांसोबत शालेय विद्यार्थीही परिपाठ गिरवत आहेत. मग ऐकतोय  कोण ?  असेच अवघड जागी दुखणं झाले आहे. दरम्यान, आपापली कार्यकर्ता फॅक्टरी टिकवण्यासाठी क्रिकेट टीम, नविन फॅड आलेली लीग स्पर्धेला बक्षीस रूपातून खतपाणी घालण्याच्या पुढारी, नेत्यांच्या परंपरेत आता काही मराठी उद्योजकांनीही क्रिकेट लीगसाठी स्पॉन्सरची खैरात सुरू केल्याने तरुणांची करिअर की अधोगती असाच सवाल उपस्थित झाला आहे, तर नेते, पुढारी राजकारण, नको तो व्यवसाय उभारून मालामाल होत आहेत . उद्योजक शहरात उद्योग उभारून कुटुंबाचे राहणीमान उच्चप्रतीचे करतात, मग ग्रामीण तरुण क्रिकेटमध्ये कितपत गुंतून ठेवावीत ? याचा जरूर विचार करावा लागेल हे अधोरेखित करणे महत्वाचे आहे.

कोकण मुख्यतः रायगडातील तरुण क्रिकेट खेळात अधिक गुंतल्याचे नवीन नाही. जणूकाही  व्यसन लागले आहे. रत्नागिरी पट्टयातील तरुण शहरात वेठबिगर म्हणून वावरत आहे आणि रायगड जिल्हा मधील विविध तालुक्यातील,गाव वाडीपाड्यातील तरुण क्रिकेटच्या अधीन गेलाय हे कोणाला सांगण्याची गरज नाही. मूळात आज स्थानिक तरुण प्रशासन सेवेत उच्च पदस्थ नोकरीत नाहीत. गटविकास, प्रांत, तहसील, पोलीस क्लास वन अधिकारी नाहीत हे सत्य आहे. तरुणांत मोठी स्वप्नच नाहीत. नोकर भरती, स्पर्धा परीक्षांत टक्का नाही. वनविभाग अन्य नोकर भरतीत रायगडातील एकही तरुण नव्हता, ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे . आता खुद्द विविध ठिकाणी सुरू होणाऱ्या स्पर्धा अकादमीत किती मुले सहभाग घेतात ? याच वास्तवात स्थानिक तरुण क्रिकेटच्या दुनियेत  कमालीचा अडकून पडला आहे. नेते, पुढारी, काही उद्योजक अडकवून ठेवत असल्याचे दिसत आहे.  क्रिकेटचा वेड आता आदिवासी, ठाकूर तरुणांनाही भुरळ घालत आहे. दुचाकीवर वेगवान तीनचार तरुण जाताना दिसतात, अपघातही होतात. तरुणांत व्यसनही वाढत असल्याचे लपून राहिले नाही. याच चर्चेत क्रिकेटचे अतिवेड आजच्या तरुणांच्या करिअरवर घाला घालत आहे. गाव वाडीपाड्यातील लीग स्पर्धेसाठी आता चक्क मराठी उद्योजकही उतरलेत, बक्षीसांची खैरात करत असल्याचे समोर आल्याने चाललेय काय ? स्वतः यशस्वी उद्योजक क्रिकेट तरुणांत नेमके काय पाहतात, भविष्य काय उज्ज्वल करू पाहतात ? हे अद्याप कळले नाही. तरीही जिल्हा, तालुक्यातील काही तरुणांना क्रिकेट अँकॅडमीत प्रवेश द्यावा, देश, राज्य क्रिकेट संघात जाण्यासाठी घडवावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.क्रिकेटच्या अतिवेडाने इच्छाशक्ती, महत्त्वकांक्षा गिळून टाकली, व्यसनाची मात्रा वाढली, आता क्रिकेट खेळातून उद्यातरी काय साध्य होते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, नेते, पुढारी सारेजण शिक्षण, रोजगारावर बोलणार नाहीत. किमान यशस्वी उद्योजकाने जाणीवा ठेवून शिक्षण, रोजगार याचे जास्तीचे भान ठेवावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रिकेट खेळामुळे अनेक जणांचे भविष्य घडले तरी अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. क्रिकेट मुळे तरुण वर्ग महत्वाच्या मूळ मुद्द्यापासून भरकटला असून  क्रिकेट मुळे विद्यार्थी व तरुणांनी अभ्यास व करिअर कडे दुर्लक्ष केले आहे.मुले सतत क्रिकेट खेळत असल्याने आता आई वडिलांची चिंता वाढली आहे. त्यामुळे  जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

फ्रेंड्स ऑफ नेचर (FON), चिरनेर यांच्यातर्फे पर्यावरणपूरक व वृक्षमैत्री होळी साजरी करण्याचे आवाहन !

फ्रेंड्स ऑफ नेचर (FON), चिरनेर यांच्यातर्फे पर्यावरणपूरक व वृक्षमैत्री होळी साजरी करण्याचे आवाहन !

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या फ्रेंड्स ऑफ नेचर (FON), सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था,चिरनेर-उरण संस्थेच्या वतीने नागरिकांना यावर्षी होळी सण पर्यावरणपूरक व वृक्षमैत्री ने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जनजागृती संदेशात नमूद करण्यात आले आहे की, होळी हा आनंद, एकात्मता आणि निसर्गाशी नाते दृढ करणारा सण असला तरी सण साजरा करताना झाडांची तोड, रासायनिक रंगांचा वापर आणि पाण्याची उधळपट्टी यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरण, झाडे व पक्ष्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.


 होळी संदर्भातील मार्गदर्शक सूचना :
संस्थेने जिवंत झाडांची तोड न करण्याचे आवाहन केले आहे. होळी पेटवताना वाळलेल्या काटक्या, शेणकांड्या व नैसर्गिक वस्तूंचाच वापर करावा. तसेच "एक गाव – एक होळी" या संकल्पनेतून सामूहिक होळी साजरी करून लाकडांची नासाडी टाळावी, पूर्वीचे व आताचे पप्रदूषणाची भीषणता पाहता वृक्षतोड थांबवून प्रतिकात्मक होळी त्याच उत्साहाने साजरी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

 रंगपंचमीबाबत जागृती :
रासायनिक रंग टाळून फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरावेत, पाण्याची उधळपट्टी टाळून कोरडी होळी खेळावी, तसेच पक्षी, प्राणी व वृक्षांवर रंग टाकू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 ‘वृक्षमैत्री होळी’ उपक्रम :
होळीनंतर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. होळीची राख सेंद्रिय खत म्हणून वापरावी. परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिकमुक्त सण साजरा करण्यावरही भर देण्यात आला आहे.फ्रेंड्स ऑफ नेचरच्या या उपक्रमातून “झाडे वाचवा, पाणी जपा आणि सण साजरा करा जबाबदारीने” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. पर्यावरणपूरक होळीच खरी सकारात्मक ऊर्जा देणारी होळी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.या उपक्रमामुळे उरण परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सणांचे पावित्र्य राखून जर अश्या पद्धतीने होळी व धुलीवंदन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जनजागृती संदेशात नमूद करण्यात आले आहे की, होळी हा आनंद, एकात्मता आणि निसर्गाशी नाते दृढ करणारा सण असला तरी सण साजरा करताना झाडांची तोड, रासायनिक रंगांचा वापर आणि पाण्याची नाहक उधळपट्टी यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

संस्थेने जिवंत झाडांची तोड न करण्याचे आवाहन केले आहे. होळी पेटवताना वाळलेल्या काटक्या, शेणकांड्या व नैसर्गिक वस्तूंचाच वापर करावा. तसेच "एक गाव – एक होळी" या संकल्पनेतून सामूहिक होळी साजरी करून लाकडांची नासाडी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे

कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण चा राज्यस्तरीय सन्मान !!

कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण चा राज्यस्तरीय सन्मान !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण, जिल्हा रायगड, यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५- २६ मध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाने उत्तुंग यश मिळवले आहे. त्यामुळे महाविद्यालयाला विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. दिनांक २५/२/२०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत,रवींद्र साठे सभापती खादी ग्रामोद्योग महामंडळ महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. 

सदर कार्यक्रमात महाविद्यालयास उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट करिअर संसद जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले. करियर कट्टा अंतर्गत ए.डब्ल्यू. एस. करिअर टूर या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयास द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सोलर एनर्जी  जनजागृती २०२५- २६ मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, तसेच शंभर टक्के सोलार एनर्जी जनजागृती चे प्रमाणपत्र देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला. पावसाळ्यामध्ये मराठवाडा विभागात पूर परिस्थितीमुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतेही बाधा येऊ नये म्हणून महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान केले होते. म्हणून राज्यस्तरावर महाविद्यालयास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे करियर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. प्रा. हनुमंतराव जगताप यांना राज्यस्तरीय विशेष कामगिरीबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत  यशवंत शितोळे अध्यक्ष करियर कट्टा महाराष्ट्र राज्य  आणि प्राचार्य डॉ. वाल्मिक गरजे  यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून विविध उपक्रम घेण्यात आले होते. तसेच आय क्यू एसी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, जेष्ठ प्राध्यापक व्ही. एस. इंदुलकर , एन एस एस समन्वयक डॉ.डी. पी. हिंगमिरे, अकाउंट्स अँड फायनान्स विभागातील सर्व प्राध्यापक, कला शाखेतील सर्व प्राध्यापक, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी आर कारुळकर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रा. आनंद गायकवाड, ग्रंथालय प्रमुख श्याम धारासुरकर आणि महाविद्यालयीन प्रशासकीय कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. आणि विविध विभागात प्राविण्य मिळवले. रायगड जिल्हा करिअर कट्टा समन्वयक म्हणून डॉ. हनुमंतराव जगताप तालुका समन्वयक म्हणून डॉ. डी.पी. हिंगमिरे उत्तम प्रकारे कार्य करीत आहेत. वरील प्रकारे महाविद्यालयाला यश मिळाल्यामुळे संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर सर्वच स्तरातून  शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

चाळीसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमडू बाॅईज येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा !!

चाळीसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमडू बाॅईज येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा !!

चाळीसगाव, प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमडू बाॅईज, ता चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील शाळेत मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला, यावेळी श्री युवराज नामदेव बच्छे यांनी शाळेला कवीवर्य कुसुमाग्रज यांची प्रतिमा व विद्यार्थीना भेट वस्तू घेण्यासाठी रोख १००० (एक हजार) रुपये दिले याप्रसंगी श्री. बच्छाव यांनी श्री सतीलाल सोनवणेसर, श्री संजय बोरसेसर, श्रीमती मुन्ना देशमुख मॅडम यांनी मराठी भाषेचा इतिहास तसेच माहिती सांगितली.

या कार्यक्रमासाठी श्रीमती आनिता बोरसे मॅडम श्री महाजनसर श्री परदेशी यांनी विशेष सहकार्य केले.

साहित्य संघ मंदिर गिरगांव येथे शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार महासंघाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा !!

साहित्य संघ मंदिर गिरगांव येथे  शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार महासंघाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा !!

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
              ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात सुप्रसिद्ध श्री.निवास संगीतकार श्री.निवास खळे यांच्या गीतांवर आधारित संगीत रजनी हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
               यावेळी उपस्थित मान्यवर उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री उदय सामंत,ज्येष्ठ नेते श्री. गजानन कीर्तीकर, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे ,शिवसेना नेत्या सौ. मीनाताई कांबळी, मा.आ. सचिव/प्रवक्ते श्री. किरण पावसकर, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर श्री.संजय घाडी, बेस्ट समितीच्या अध्यक्षा सौ.तृष्णा विश्वासराव, सुधार समिती अध्यक्षा सौ.संध्या दोषी, 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार श्री.विश्वास पाटील यांसह  नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..

सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..

शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय निमंत्रित कवींचे काव्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी शुभम कदम, सौ. समृद्धी गोणबरे, ज्ञानेश्वर पाटील, वैशाली कोवळे, प्रगती शिर्के, राष्ट्रपाल सावंत, अरुण मोर्ये आदींनी आपल्या सर्वोत्तम कविता सादर केल्या. या काव्य मैफीलीस सत्कोंडीकरांनी व उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली..

यावेळी दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर हे मे महिन्यात  सेवानिवृत होत आहेत. सत्कोंडी व कोळेकर सरांचे नेहमीच एक सौदार्य नाते अबाधित राहिले आहे. शाळेच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न  हे गौरवास्पद असल्याने त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक व पेन देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य  केंद्राच्या माध्यमातून गेली सात वर्षे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉ. श्रृती कदम यांचाही शाल, श्रीफळ, बुके, पुस्तक व पेन देवून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व निमंत्रित कवींना सहभागाचे प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, पुस्तक व पेन देवून गौरव करण्यात आला.

नेटके नियोजन, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती पाहून अनेक कवींनी समाधान व्यक्त केले.यावेळी माजी प्राचार्य प्रकाश वंजोळे, श्री सुवेश चव्हाण सर, श्री नितीन बैकर, श्री नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य, श्री सुभाष पालये सर, सौ.वर्षा अशोक कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ  उपस्थित होते. या सोहोळ्याचे स्वागत व प्रास्ताविक श्री संजय बैकर यांनी केले.आभार सरपंच सतिश थुळ यांनी केले.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

महाराष्ट्र चेंबरच्या नूतनीकृत ‘एकनाथ ठाकूर अध्यक्षीय दालना’चे उद्घाटन !!

महाराष्ट्र चेंबरच्या नूतनीकृत ‘एकनाथ ठाकूर अध्यक्षीय दालना’चे उद्घाटन !!

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाइन उपस्थिती; ‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमाचे कौतुक*

मुंबई, दि. २५ (राहुल बैसाणे) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या नूतनीकृत ‘एकनाथ ठाकूर अध्यक्षीय दालन’चे उद्घाटन बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या सोहळ्याचे उद्घाटन  राज्याचे गृह (ग्रामीण ), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण आणि खाणकाम राज्यमंत्री पंकज भोईर यांनी केले. 

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

राज्याच्या अधिवेशनामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. महाराष्ट्र चेंबरला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देत शताब्दी वर्ष गाठणे ही अत्यंत अभिमानास्पद व ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीत चेंबरचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत संस्थेचे अभिनंदन केले.

अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या “गाव तिथे उद्योजक” या संकल्पनेचे विशेष कौतुक करत प्रत्येक गावातून उद्योजक घडविण्याचा हा उपक्रम राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात उद्योगनिर्मिती वाढल्यास स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र चेंबरला आवश्यक ती सर्वतोपरी मदत शासन स्तरावरून केली जाईल व शासन ठामपणे पाठिशी उभे राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

दावोस दौऱ्याचा आढावा देताना राज्यात विक्रमी प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होत असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात होत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या सोहळ्यास राज्याचे गृह (ग्रामीण ), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण आणि खाणकाम राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी अध्यक्ष व एम्पायर स्पायसेस अँड फूडचे मॅनेजिंग डायरेक्टर हेमंत राठी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे,  उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, शंकर शिंदे, संगीता पाटील, प्रफुल्ल मालाणी, राज्य मुख्य समन्वयक वेदांशु पाटील, सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. पंकज भोईर म्हणाले, “गाव तिथे उद्योजक” हा अध्यक्ष माणगावे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला स्तुत्य उपक्रम असून राज्याला अशा उपक्रमाची गरज आहे. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रात काम करणारे आणि सरकार यांच्यातील महाराष्ट्र चेंबर हा महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात उद्योगाला पोषक वातावरण निर्माण झाले असून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक उद्योग निर्मितीत चेंबरने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रमुख पाहुणे महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष व एम्पायर स्पायसेस अँड फूडचे मॅनेजिंग डायरेक्टर हेमंत राठी म्हणाले की, महाराष्ट्र चेंबरने आम्हाला मोठे केले. एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या नावाने दालन उभे राहणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष रविंद्र माणगावे म्हणाले, स्व. एकनाथ ठाकूर यांनी उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रात भरीव काम केले. त्यांनी स्थापन केलेली सारस्वत बँक आज देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. त्यांनी अनेक उद्योजक आणि कार्यकर्ते घडवले. त्यांच्या विचारांच्या पायावरच महाराष्ट्र चेंबरची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. एखादा अपवाद वगळता महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी कार्य केलेल्या मान्यवरांनी आजवर कधीही धर्म, जात-पात, भाषा किंवा खानपान याबाबत भेदभाव न करता राज्याच्या औद्योगिक विकासासाठी भरीव योगदान दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विश्वस्त मंडळाच्या चेअरमन आशिष पेडणेकर यांनी सांगितले की, स्व. एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत कार्यरत राहिल्यामुळेच यश मिळाले. महाराष्ट्र चेंबरच्या प्रगतीत ठाकूर यांचा मोठा वाटा असून त्यांच्या नावाचे दालन उभे राहणे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.                                                                                                                      माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सुरेश घोरपडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दरम्यान, या सोहळ्याला महाराष्ट्र चेंबरच्या माजी अध्यक्षा सौ. मीनल मोहाडीकर, नाशिक इंडस्ट्रीज अँण्ड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष नहार, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबरचे जीसी सदस्य, आणि 300 पेक्षा अधिक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*** फोटो कॅप्शन - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या नूतनीकृत ‘एकनाथ ठाकूर अध्यक्षीय दालन’चे उद्घाटनप्रसंगी राज्याचे गृह (ग्रामीण ), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण आणि खाणकाम राज्यमंत्री पंकज भोईर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करतांना अध्यक्ष रविंद्र माणगावेसमवेत माजी अध्यक्ष व एम्पायर स्पायसेस अँड फूडचे मॅनेजिंग डायरेक्टर हेमंत राठी, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे,उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, शंकर शिंदे, संगीता पाटील, प्रफुल्ल मालाणी तर दुसऱ्या छायाचित्रात गाव तिथे उद्योजक उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करतांना राज्याचे गृह (ग्रामीण ), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण आणि खाणकाम राज्यमंत्री पंकज भोईर, अध्यक्ष रविंद्र माणगावेसमवेत माजी अध्यक्ष व एम्पायर स्पायसेस अँड फूडचे मॅनेजिंग डायरेक्टर हेमंत राठी, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे,उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, शंकर शिंदे, संगीता पाटील, प्रफुल्ल मालाणी.

Thursday, 26 February 2026

अभिनव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा !!

अभिनव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा !!

भाईंदर प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव वाढविण्याच्या उद्देशाने अभिनव शेतकरी मंडळ संचालित अभिनव महाविद्यालय, गोडदेव, भाईंदर पूर्व येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभाग तसेच विद्यार्थी-शिक्षक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “बोली आणि संस्कृती (वेशभूषा)” या विषयावर आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

ही स्पर्धा दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. 

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचे वैशिष्ट्य दर्शविणारी नाट्यछटा व पारंपरिक वेशभूषा सादर करणे अपेक्षित असून प्रत्येक स्पर्धकाला ३ ते ५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

या उपक्रमासाठी ह. भ. प. प्रा. डॉ. ज्ञानेश्वर महाराज भोसले (सहाय्यक प्राध्यापक, पी. एल. श्रॉफ महाविद्यालय, चिंचणी, डहाणू) हे परीक्षक आणि प्रवचनकार म्हणून उपस्थित राहणार आहे. 

स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य आणि मराठी विभागप्रमुख प्रा. उत्तम भगत आणि विद्यार्थी-शिक्षक परिषद प्रभारी प्रा. वैष्णवी पाटील ह्यांनी केले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा आणि सांस्कृतिक परंपरा जाणून घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

होळीत खेळला जाणारा आट्या पाट्या खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर !!

होळीत खेळला जाणारा आट्या पाट्या खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर !!

ऐतिहासिक व धार्मिक परंपरा व महत्व असलेले आट्या पट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर ; नवीन पिढी खेळापासून दूर !!

होळी जवळ आली कि सर्वांना आठवण होते ती आट्या पट्या खेळाची.

उरण मध्ये पूर्वी मोठया उत्साहाने खेळला जाणारा आट्या पट्या खेळाला उतरती कळा.

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : होळी जवळ आले कि सर्वांना आठवण होते ती आट्या पट्या खेळाची. प्राचीन काळापासून चालत आलेल्या व भारतीय परंपरेतील आट्या पट्या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र सध्याच्या २१ व्या युगातील जीवघेण्या स्पर्धेच्या व धक्का धक्कीच्या युगात हा खेळ मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उरण तालुक्यात पूर्वी मोठया उत्साहात व आनंदाने खेळल्या जाणारे सण आता उरण मध्ये एक दोन ठिकाणे सोडली तर कुठेही खेळले जात नाही. पूर्वी उरण तालुक्यात हा खेळ होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून जिथे होळी जाळली जाते त्या ठिकाणी खेळला जात होता.आता मात्र नवीन पिढीला हा खेळ माहित नसल्याने तसेच मैदानी खेळापासून आजची लहान मुले हळू हळू दूर जात असल्याने सध्या हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी या खेळाला राजश्रय होता म्हणून हा खेळ टिकून राहिला.आता मात्र या खेळाला शासकीय अनुदान व सहकार्यावर अवलंबून राहावे लागते.भारतीय संस्कृतीतील या खेळाला नव संजीवनी प्राप्त करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त प्रमाणात या खेळाचे सर्वत्र आयोजन केल्यास, जनजागृती केल्यास निश्चितच या खेळाला चांगले दिवस येतील.

उरण शहरामध्ये श्री शीतळा देवी मंदिर देऊळवाडी येथे होळीच्या ठिकाणी आट्या पट्या खेळण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. पूर्वी होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून देऊळवाडी उरण शहरात हा खेळ खेळला जायचा आता मात्र होळीच्या दिवशी एकच दिवस हा खेळ उरण शहरातील देऊळवाडीत खेळला जातो.

आट्यापाट्या हा महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये (किलिथट्टू नावाने) लोकप्रिय असलेला, शारीरिक चपळाई व धोरणात्मक कौशल्याचा प्राचीन भारतीय मैदानी खेळ आहे. दोन संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात, एका संघाला सूरपाटी व इतर नऊ आडव्या पाट्यांतून (गाळ्यांतून) बचाव करत, प्रतिस्पर्ध्यांच्या अडथळ्यांना हुलकावणी देऊन शेवटच्या लोणपाटीपर्यंत पोहोचायचे असते.

कोट (चौकट ):- 

आट्यापाट्या खेळाची सविस्तर माहिती :

मैदान आणि रचना:-  हा खेळ सपाट मैदानात खेळला जातो.शहरात मैदानात हा खेळ खेळला जातो.यात मध्यभागी एक लांब रेषा (मृदंगपाटी किंवा सूरपाटी) असते आणि तिला छेदून ९ आडव्या पाट्या (कप्पे) असतात. खेळाच्या सुरुवातीच्या पाटीला 'चांभारपाटी' तर शेवटच्या पाटीला 'लोणपाटी' म्हणतात.खेळाडू आणि संघ: प्रत्येक संघात साधारणपणे ९ खेळाडू असतात. खेळामध्ये दोन संघ असतात: एक 'पाटी धरणारा' (Defending) आणि दुसरा 'खेळणारा' (Attacking)   असे दोन संघ असतात. एक संघ बचावाच्या भूमिकेत तर दुसरा संघ आक्रमणच्या भूमिकेत असतो.

खेळाचे नियम आणि उद्देश: - 
बचाव (Defending) भूमिकेत असलेले  खेळाडू फक्त उभ्या रेषेवर (सूरपाटी) पाय ठेवून दोन्ही बाजूंना उड्या मारून किंवा धावून अटॅकिंग खेळाडूंना आडव्या पाट्या ओलांडण्यापासून रोखतात.

आक्रमण (Attacking)च्या भूमिकेत असणारे,खेळणारे खेळाडू हुलकावणी देऊन, वेगाने धावत एक-एक पाटी पार करून लोणपाटीपर्यंत जातात.एक एक चौकोन पार करत पुढे जातात व शेवटी आपले उद्दिष्टे साध्य करतात.

बाद (Out): -जर पाटी धरणाऱ्या खेळाडूने धावणाऱ्या खेळाडूला स्पर्श (Touch) केला, तर तो खेळाडू बाद होतो.त्यामुळे अत्यंत एकाग्रतेने हा खेळ खेळला जातो.

गुण:-  जो खेळाडू नऊही पाट्या पार करून लोणपाटीपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा सुरक्षित माघारी फिरतो, त्या संघाला गुण मिळतात.

फायदे: - या खेळामुळे मुलांमध्ये चपळता, वेग, निर्णयक्षमता आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.या खेळामुळे शरीराचा विशिष्ट व्यायाम तर होतोच शिवाय एकाग्रता सुद्धा वाढीस लागते.मनोरंजन आणि व्यायामाव्यतिरिक्त, हा खेळ वैयक्तिक वेगवानपणा आणि सामूहिक संघ कामगिरीचे उत्तम संयोजन आहे.

इतिहास: हा खेळ अत्यंत प्राचीन असून महाराष्ट्रात संत तुकारामांच्या काळापासून प्रचलित आहे.हा खेळ मुख्यत्वे भारतातील काही ग्रामीण भागात, विशेषतः होळी किंवा इतर सणांच्या वेळी अत्यंत उत्साहाने खेळला जातो.महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय असलेला, आत्या-पत्या हा एक प्राचीन क्रीडा खेळ आहे ज्यामध्ये गुंतागुंतीचे नियम आहेत. तामिळनाडूमधील किलिथट्टू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी प्रदेशातून उगम पावलेला हा खेळ बऱ्याच काळापासून धोरणात्मक विचारसरणी आणि शारीरिक चपळतेची चाचणी म्हणून ओळखला जातो. हा खेळ राष्ट्रीय व्यासपीठावर तमिळ ओळख वाढवतो. महाराष्ट्रात आट्या पट्या म्हणून हा खेळ ओळखला जातो. महाराष्ट्रात हा खेळ पूर्वी 'भांडणाचा खेळ' म्हणून प्रसिद्ध होता. प्रत्येक राज्यात व देशात या खेळाला वेगवेगळे नाव आहेत. गुजरात राज्यात आटा पाता, खरो पाट, लुणी पाट, तामिळनाडू मध्ये किलीथट्टू, धटूतुकडा, उप्पू कोडू, उप्पू पटाई, बंगाल मध्ये डोरिया बांध, महाराष्ट्र मध्ये सुरपट्या, आत्या पत्या, आट्या पट्या, सारगरी, सरमणी, पंजाब मध्ये लोणापती, सुरपती चिक्का, यूरोप मध्ये ढोंगाचा खेळ, अतिरेक्यांचा पाठलाग या नावाने हा खेळ परिचित आहे

रंगबेरंगी पिचकाऱ्या बाजारात दाखल ; वस्तूंच्या किंमतीमध्ये पाच टक्के वाढ !!

रंगबेरंगी पिचकाऱ्या बाजारात दाखल ; वस्तूंच्या किंमतीमध्ये पाच टक्के वाढ !!

** धूलीवंदननिमित्त बाजारपेठा सजल्या. बच्चे कंपनीची वाढली गर्दी !!

** उरण मध्ये काही ठिकाणी होळीच्या १० दिवसा अगोदर लहान होळी पेटविण्याची परंपरा.

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : संपूर्ण महाराष्ट्रात होळी व रंगपंचमी सण मोठया उत्साहात साजरा केला जातो.राज्यासह रायगड जिल्ह्यात होळीनंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरा केला जातो. या निमित्त एकमेकाच्या अंगावर रंगाची उधळण केली जाते. त्यासाठी लागणारे पर्यावरण पुरक रंग तसेच वेगवेगळ्या आकाराच्या व रंगाच्या पिचकाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक बाजारात दाखल झाल्या आहेत.उरण तालुक्यातील बाझारपेठ मध्येही पिचकाऱ्या व रंग मोठया प्रमाणात दाखल झाले आहेत.यंदा मात्र रंगासह पिचकाऱ्यांच्या किंमतीमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एका वस्तूमागे किमान ५ रुपये अधिक मोजण्याची वेळ ग्राहकांवर येणार आहे.धुलिवंदननिमित्त रंगाची उधळण करण्याचा खेळ ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी साजरा केला
जातो. ही परंपरा आजही जपली जाते. यावर्षी यंदा सोमवार दि २ फेब्रुवारी रोजी होळी आहे.होळी उभारून पारंपारिक व धार्मिक पद्धतीने विधीपत पूजन केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.३) धुलिवंदन आहे. या दिवशी सकाळपासून सर्वच ठिकाणी रंगाची उधळण केली जाणार आहे. एकमेकांच्या अंगावर रंग उडवून धुलिवंदनाचा आनंद लुटला जाणार आहे. धुलिवंदन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. धुलिवंदन साजरा करण्यासाठी लागणारे रंग, बेगवेगळ्या रंगाच्या च आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. साध्या पिचकाऱ्यांसह बंदुकवाल्या आणि टँकरवाल्या पिचकाऱ्यांची दुकाने सजली आहेत. तसेच, मुलाच्या आवडीचे छोटा भीम, बेनटेन, बॉबी डॉलची कार्टून असलेली पिचकारी देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या पिचकाऱ्यांची किंमत १० रुपायंपासून ३०० रुपयांपर्यंत आहे. काही ठिकाणी किंमती स्थीर आहेत. तर, काही ठिकाणी या वस्तूंच्या किंमतीमध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वस्तू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने या वस्तूंचे दर काही प्रमाणात बाढविण्यात आले आहे. महागाईची झळ असतानाही त्यावर मात करीत धुलिवंदन सण साजरा करण्यासाठी खरेदीला पसंती दिली आहे. उरण तालुक्यात बाजारात पिचकाऱ्या खरेदीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५० टक्के खरेदी झाली आहे. धुलिवंदनच्या दोन दिवस अगोदर म्हणजे २८ फेब्रवारी व १ मार्च या तारखेला ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याचे उरण मधील विक्रेत्यांनी वर्तविले आहे.

कोट (चौकट) :- उरण मध्ये काही ठिकाणी होळीच्या १० दिवसा अगोदर लहान होळी पेटविण्याची परंपरा आहे. उरण शहरातील देऊळवाडी येथे श्री शीतळादेवी मंदिर समोर दरवर्षी होळीच्या दहा दिवसा अगोदर छोटी होळी पेटविली जाते.अंदाजे १०० वर्षाहून जास्त वर्षाची ही परंपरा आजच्या २१ व्या युगातही तरुण मोठया प्रमाणात आनंदाने व मोठया उत्साहाने साजरी करतात. या सणात सर्वांना सहभागी करून घेतात

28 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे 27 राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन !!

28 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे  27 राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन !!
वाशिमप्रतिनिधी ::
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वैकंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर वाटाणे लॉन वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार व पदाधिकारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांनी दिली

स्थानिक वाटाणे लॉन येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संम्मेलनाचे उद्‌घाटन केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. सहउद्‌घाटक म्हणून महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकंत्री ना. दत्तात्रय भरणे राहतील. विशेष आशिर्वाद उपस्थिती म्हणून आयोध्या मंदिर कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांचे बंधू भागवताचार्य प.पु. रमाकांत व्यास,पाध्यक्ष राजु भांदुर्गे, महाराष्ट्र संघाचे  प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे. राज्य संघटक संजय भोकरे.डिजीटल मिडिया अध्यक्ष सिध्दार्थ भोकरे.प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष महेश पानशे ..किशोर रायसाकडा अशोक देडे. डॉ. अभय कुमार दांडगे. संपर्क प्रमुख वैभव स्वामी . कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल रहाणे. विदर्भ प्रमुख नयन मोंढे ... पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरटे.नागपूर विदर्भ प्रमुख अनुपम कुमार भार्गव विशेष अतिथी म्हणून सहकार मंत्री ना. आकाश फुंडकर, कॅबीनेट मंत्री ना. संजय राठोड, , विभागीय अध्यक्ष सुनिल फुलारी, चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष दिपक ढोके उपस्थित राहणार आहेत.


 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने यंदाचा उत्कृष्ट संघटक युवा चेतना पुरस्कार 2025 /26 .....

श्री किशोर रायसाकडा प्रदेश उपाध्यक्ष.... पाचोरा जळगाव..... उत्तर महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक

श्री नयन मोंढे... उत्कृष्ट संघटक अमरावती ......विदर्भ अध्यक्ष

श्री राकेश खराडे.रायगड जिल्हा अध्यक्ष.... उत्कृष्ट संघटक कोकण विभाग

श्री. शंकर बोरघरे ...... उत्कृष्ट संघटक....चंद्रपूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष

श्री अनुपम कुमार भार्गव... वर्धा.. उत्कृष्ट संघटक.. नागपूर विदर्भ

श्री वैभवजी स्वामी.. प्रदेश संपर्कप्रमुख...बिड.. मराठवाडा उत्कृष्ट संघटक...

 गणेश देवगावकर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया वाशिम... उत्कृष्ट संघटक....

नागेश आदापुरे ... पंढरपूर...पश्चिम महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक..........

 मा... दशरथ चव्हाण . जिल्हा अध्यक्ष...नवी मुंबई ....उत्कृष्ट संघटक... ..
.
मा पोपटराव गवांदे मु पो इगतपुरी नाशिक जिल्हा.. उत्कृष्ट संघटक... यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. ...

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत पत्रकारांचा डिएनए काय व अजितदादा पवार यांच्या मृत्यूचे राजकारण तर होत नाही ना? या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यसंघटक सिध्दार्थ भोकरे, जेष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे, प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकोडे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्‍वासराव आरोटे सहभागी होतील. चर्चासत्राचे संचालन प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी करतील. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान पदाधिकारी सन्मान सोहळा व 4 ते 5 वाजेपर्यंत द्वितीय प्रबोधन सत्र पार पडतील यामध्ये जेष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे हे सायबर युगातील माध्यमे आणि मुल्यनिष्ठ पत्रकारीता या विषयावर मार्गदर्शन करतील. प्रबोधन सत्राचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संघटक संजय भोकरे, अध्यक्षस्थानी ऍड. सौ. भारती सोमाणी, प्रमुख अतिथी सौ. वृषाली टेकाळे हे राहतील. यावेळी.... संत विचारातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर प्रचार प्रमुख गोपाल कडू मार्गदर्शन करतील, सभाध्यक्ष सर ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, उद्‌घाटक दामोदर पाटील गुरजी, विशेष अतिथी बाबाराव पाटील राहतील. सदर कार्यक्रमामध्ये सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक आ. शाम खोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्‍वासराव आरोटे. निलेश सोमाणी, स्वागताध्यक्ष गिरधारीलाल सारडा, मुख्य समन्वयक डॉ. हरिष बाहेती, सहस्वागतध्यक्ष देवेंद्र खडसे पाटील, कार्याध्यक्ष शिवाजीराव वाटाणे, पत्रकार ऍड. भारती सोमाणी, विदर्भ अध्यक्ष नयन मुंढे, विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर, विभाग अध्यक्ष सुनिल फुलारी, जिल्हाध्यक्ष किरण क्षार, शहर जिल्हाध्यक्ष पप्पु घुगे, इलेक्ट्रॉनिक मिडीया जिल्हाध्यक्ष राम धनगर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष गणेश देगांवकर, डिजीटील मिडीया जिल्हाध्यक्ष कैलास महाजन, सहजिल्हाध्यक्ष संजय खडसे, विदर्भ समन्वयक मोहीत कर्नावट विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे, प्रदेश सदस्य पंकज सोनोने, रवि अंभोरे, नारायण आरु, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जिल्हाध्यख प्रफुल बानगावकर, जिल्हा उपाध्यक्ष समिर देशपांडे, अमोल अघम, संतोष गुल्हाणे, राजकुमार ठाकूर, संजय राठी, शाम अपूर्वा, बंडू राठोड, शिवाजी खडसे, ऍड. सुरेश टेकाळे, सौ. वृषाली टेकाळे, गोरखनाथ भागवत, विजय घोंगडे, यांनी केले आहे. सदर कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वाराला विदर्भ केसरी स्व. ब्रजलाल बियाणी तर परिसराला वैकुंठधामवासी सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर नाव देण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी पत्रकार बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ वतीने करण्यात आले आहे.


[कोट...महाराष्ट्र राज्य पत्रकार.संघटनात्मक युवा चेतना पुरस्कार 2025 26 जाहीर.
श्री किशोर रायसाकडा प्रदेश उपाध्यक्ष.... पाचोरा जळगाव..... उत्तर महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक

श्री नयन मोंढे... उत्कृष्ट संघटक अमरावती ......विदर्भ अध्यक्ष

श्री राकेश खराडे.रायगड जिल्हा अध्यक्ष.... उत्कृष्ट संघटक कोकण विभाग

श्री. शंकर बोरचाटे ...... उत्कृष्ट संघटक....चंद्रपूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष

श्री अनुपम कुमार भार्गव... वर्धा.. उत्कृष्ट संघटक.. नागपूर विदर्भ

श्री वैभवजी स्वामी.. प्रदेश संपर्कप्रमुख...बिड.. मराठवाडा उत्कृष्ट संघटक...

 गणेश देवगावकर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया वाशिम... उत्कृष्ट संघटक....                                     नागेश आदापुरे ... पंढरपूर...पश्चिम महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक
.मा... दशरथ चव्हाण . जिल्हा अध्यक्ष...नवी मुंबई ....उत्कृष्ट संघटक... मा पोपटराव गवांदे मु पो इगतपुरी नाशिक जिल्हा.. उत्कृष्ट संघटक.. 
राजेंद्र लक्ष्मणराव शिंदे... मु पो..बिलोली /नांदेड.... उत्कृष्ट संघटक पुरस्कार .यांना जाहीर करण्यात आला..

उरण नगरपालिकेत तक्रार व अभिप्राय पेटी बसविण्याची मागणी !!

उरण नगरपालिकेत तक्रार व अभिप्राय पेटी बसविण्याची मागणी !!

** उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांना निवेदन

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
उरण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांचे वेळेत व पारदर्शक निवारण व्हावे यासाठी नगरपालिका कार्यालयात तक्रार पेटी व अभिप्राय पेटी बसविण्यात यावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिक अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी सादर करतात; मात्र त्या तक्रारींचे वेळेत निवारण होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. परिणामी प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत आहे.
नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात तसेच समस्यांचे पारदर्शक व वेळेत निवारण व्हावे यासाठी नगरपालिका कार्यालयात “तक्रार पेटी” व “अभिप्राय पेटी” बसविणे आवश्यक असल्याचे संघाने नमूद केले आहे. सदर पेट्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या तक्रारी, सूचना व अडचणी लेखी स्वरूपात नोंदविता येतील. आठवड्यातून किमान एकदा या पेट्या उघडून प्राप्त निवेदनांवर संबंधित विभागाने कार्यवाही करावी आणि त्याबाबत अर्जदारास लेखी कळवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच समस्या निकाली निघाल्यानंतर नागरिकांना अभिप्राय देण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचे आश्वासन दिले असल्याने त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविल्यास नागरिक-प्रशासन संवाद अधिक प्रभावी होईल, असा विश्वास उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर यांनी व्यक्त केला आहे

सफाई कामगारांना वारसाहक्काने नोकरी मिळावी यासाठी सकारात्मक चर्चा !!

सफाई कामगारांना वारसाहक्काने नोकरी मिळावी यासाठी सकारात्मक चर्चा !!

** दिरंगाई करणाऱ्या आस्थापना प्रमुखावर कारवाई होणार.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :

दि. २६/२/२०२६ रोजी आयुक्त तथा संचालक  अभिषेक कृष्णा यांची माजी मंत्री  प्रवीण प्रतापराव भोसले, रविंद्र प्रतापराव भोसले , कामगार नेते  संतोष पवार, यांनी सफाई कामगारांना वारसाहक्काने नोकरी मिळावी या विषयाच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन संचालनालय, सीबीडी बेलापूर,नवी मुबंई येथे प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी उपायुक्त रमाकांत गोसावी, मनोहर पाटील, सफाई कामगारांचे वारस तसेच सुनील परब, गोपाळ सावंत, नितिन कदम आदी कामगार प्रतिनिधी, मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी आयुक्त तथा संचालक  अभिषेक कृष्णा यांच्या समवेत सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळावी या मागणीसंदर्भात अभ्यासपूर्ण सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी राज्यातील ज्या ठिकाणी सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय निर्गमित झाले आहेत,त्या संदर्भात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश,  संचालनालयाचे आदेश या सर्व शासन निर्णयांचे, परिपत्रकांचे तसेच आदेशाचे गांभीर्याने वाचन न करता विनाकारण दिरंगाई होत आहे अशा सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील आस्थापना प्रमुखांवर आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी नीयमोचीत कारवाई करण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील ज्या ठिकाणी अशा प्रकारे सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठी विनाकारण अडथळे निर्माण झाले आहेत ते दूर होऊन न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांच्या राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील सफाई कामगारांना न्याय देण्याच्या अभ्यासपूर्ण सकारात्मक भुमीकेबद्दल माजी मंत्री प्रवीण प्रतापराव भोसले व उपस्थित मान्यवरांनी आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

हौसिंग सोसायट्यावरील प्रशासक हटले, समितीच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरू आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार !

हौसिंग सोसायट्यावरील प्रशासक हटले, समितीच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरू आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार ! 

नवी मुंबई, प्रतिनिधी:

नवी मुंबईतील २०० सहकारी गृहनिर्माण संस्थेवरील प्रशासकराज संपवा या साठी सहकार संवर्धन समिती व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी नवी मुंबईत सीबीडी बेलापूर येथे २३ फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू केलेले होते.या आंदोलनाची दखल घेत बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत. तसे लेखी पत्र सहकार सहनिबंधक सिडको श्री.राजेंद्र वीर यांनी आंदोलनकर्ते सुभाष बसवेकर यांना दिले आहे. 

नवी मुंबई सिडको कार्यक्षेत्रातील सुमारे २०३ सहकारी गृहनिर्माण संस्थावर गेल्या तीन वर्षा पासून प्रशासक बसविले गेले होते. त्यातील बहुतेक प्रशासकांची कायदेशीर मुदत संपूनही ते त्या ठिकाणी बेकायदा कार्यरत होते. एकूण २०३ सहकारी सोसायट्यापैकी ७६ संस्था च्या निवडणूका पार पडलेल्या असून उवरीत पैकी ७२ संस्थावर निवडणूक अधिकारी नियुक्त करून निवडणूकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. उर्वरीत दप्तर ताबा अप्राप्त असणाऱ्या ३१ संस्थाच्या दप्तरांचा ताबा घेऊन तेथील कामकाज सुरळीत करण्यात येईल. बाकी राहिलेल्या २४ संस्थापैकी १९ संस्थावर निवडणूक अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. आता उरलेल्या केवळ पाच सहकारी गृहनिर्माण संस्थावर प्रशासक असून त्यांनाही लवकरच बाजूला करून तेथे ही शीघ्र तितक्या लवकर लोकशाही पद्धतीने निवडणूका घेतल्या जाणार आहेत. अशी लेखी माहिती सह निबंधक सहकारी संस्था सिडको या कार्यालयाच्या वतीने देण्यात आंदोलकांना देण्यात आली आहे. तसेच गेल्या तीन वर्षात नियुक्त केलेल्या या प्रशासकांनी मानमानी मानधन उचलले असून कायद्याची मर्यादा ओलांडून आर्थिक व्यवहार केलेले आहे. त्या सर्व प्रशासकांच्या आर्थिक व्यवहाराची व मानधनांची चौकशी करण्यासाठी श्री.अविनाश भागवत, उपनिबंधक ठाणे शहर यांची नियुक्ती केली असून दोन महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत. विशेष म्हणजे, एका प्रशासकांस २०, १५, १० अशा संख्येने सोसायट्या बहाल केल्या होत्या. हा प्रकार आता बंद होणार असून या पुढे एका प्रशासकाची तीन पेक्षा जास्त संस्थावर नियुक्त होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. असे ही निबंधकांच्या वतीने आंदोलकांना लेखी कळविले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मानवी हक्क कार्यकर्ते प्रशांत बोरकर मुंबई यांनी पुढाकार घेतला.तसेच नवी मुंबईतील सहकार संवर्धन समिती आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते व नवी मुंबई नागरिक मंच च्या कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले. सदर आंदोलनाचा हेतू सफल झाला असून हे आंदोलन तूर्त थांबविले जात आहे. या पुढे निबंधकांच्या लेखी अश्वासनावर आम्ही नजर ठेवून ती पूर्ण करून घेऊ असे आंदोलक सुभाष बसवेकर यांनी म्हटले आहे.

सौजन्य / वृत्त - सुभाष बसवेकर

ठाण्यात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल; नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरण !!

ठाण्यात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल; नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरण !!      बातमीदार प्रतिनिधी, ठाणे: ता. १८, नाग...