ठाण्यात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल; नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरण !!
बातमीदार प्रतिनिधी, ठाणे: ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. १७ मार्च २०२६ रोजी दुपारी १४.०० ते १८.३० या वेळेत बांदोडकर महाविद्यालय, ठाणे येथील सायन्स इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पतंजली सभागृहात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनियुक्त विभागीय क्षेत्ररक्षक व उपविभागीय क्षेत्ररक्षक यांना मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माँ सरस्वतीच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी मानसेवी निदेशक तथा मास्टर ट्रेनर डॉ. राहुल घाटवळ यांनी “Whome & How to Report to Seniors” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. श्रीमती प्रमोदिनी जाधव यांनी आपले अनुभव शेअर केले. श्रीमती गोलतकर यांनी संघटनेने दिलेल्या जबाबदारीची जाणीव व्यक्त करत कार्यशाळांद्वारे सातत्याने मार्गदर्शन करण्याची विनंती केली. डॉ. किशोरजी आढळकर यांनी दिलेल्या जबाबदारीचे यशस्वीपणे पालन करण्याची ग्वाही दिली.
तसेच श्री. बिमल वसंत नथवाणी, उपमुख्य क्षेत्ररक्षक (क्षेत्र-१, ठाणे) व मानसेवी निदेशक यांनी संघटनेची रचना व अहवाल सादरीकरण याबाबत सविस्तर माहिती दिली. मा. विजय जाधव यांनी संघटना अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करत, आपत्कालीन प्रसंगी आवश्यक स्वयंसेवकांची संख्या लक्षात ठेवून प्रत्येकाने किमान एक स्वयंसेवक सोबत आणावा, असे आवाहन करुन सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी भर भरुन शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल गावित, सउनि यांनी केले. बांदोडकर महाविद्यालय व्यवस्थापनाने अल्पावधीत विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
- DCCD, NMC, ठाणे
No comments:
Post a Comment