पडघ्यात शंभर वर्षांची परंपरा जपणारी ‘बोहाडा’ यात्रा उत्साहात संपन्न !!
** मुखवटेधारी सोंगांची अनोखी परंपरा; सर्व धर्मीयांच्या सहभागातून गावात ऐक्याचा संदेश
भिवंडी, प्रतिनिधी (मिलिंद जाधव)
भिवंडी तालुक्यातील पडघे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक ‘बोहाडा’ यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने भरविण्यात येणारी ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून यावर्षीही मोठ्या संख्येने नागरिकांनी यात्रेत सहभाग नोंदवला. शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा लाभलेल्या या यात्रेत पडघेकरांनी आपली संस्कृती जपण्याचा अनोखा वारसा कायम ठेवला आहे. बोहाडा यात्रेच्या दिवशी कान्होबा मंदिरापासून ते गावाच्या वेशीपर्यंत पारंपरिक वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर देवी-देवतांची सोंगं नाचवली जातात. विशेष म्हणजे विविध देवतांचे मुखवटे घालून सोंगं सादर करण्याची ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे.
या सोहळ्यात देवी-देवतांच्या सोंगांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिरापासून गावाच्या वेशीपर्यंत नाचत जाणारी ही सोंगं पुन्हा मंदिरात परत येतात, हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या उत्साहाने उपस्थित राहतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व सोंगांचा कार्यक्रम पार पडताच ग्रामदैवत आई गावदेवीचे पात्र साजरे करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आई गावदेवीचे पात्र रितेश मेस्त्री यांनी साकारले होते. या उत्सवाची परंपरा दिवंगत कै. तुळशीराम गायकवाड यांनी सुरू ठेवली असून सध्या त्यांचे सुपुत्र जगदीश गायकवाड हे या उत्सवाची धुरा सांभाळत आहेत. गावातील नागरिक तसेच युवकांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाला लाभत असल्याने परंपरा अधिक बळकट होत आहे. यात्रेदरम्यान मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विविध मनोरंजनाची साधने, पाळणे, लहान मुलांसाठी खेळणी, तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. पडघा ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व वीजेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. गुढीपाडवा आणि बोहाडा यात्रेच्या निमित्ताने भिवंडी तालुक्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पडघ्यात दाखल झाले होते. विशेष म्हणजे या उत्सवात सर्व जाती-धर्मीय नागरिक एकत्र येऊन सहभाग घेतात, त्यामुळे गावातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याची भावना स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पडघा पोलीस ठाण्याच्या वतीने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे परंपरा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य यांचे दर्शन घडवणारी पडघ्याची ‘बोहाडा’ यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
No comments:
Post a Comment