Wednesday, 11 March 2026

उरणमध्ये १३ मार्च रोजी 'पशुसंवर्धन प्रशिक्षण व कृतीसत्र शिबिरा'चे आयोजन !!

उरणमध्ये १३ मार्च रोजी 'पशुसंवर्धन प्रशिक्षण व कृतीसत्र शिबिरा'चे आयोजन !!

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) :
 महा एन. जी. ओ. फेडरेशन, इंडियन ऑइल व अदानी व्हेंचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सहकार्याने उरण तालुक्यातील पशुपालकांसाठी विशेष 'पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण व कृतीसत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत माऊली मंगल कार्यालय, भोईरवाडी (म्हातवली-नागाव रोड) येथे संपन्न होईल.

या भव्य पशुसंवर्धन शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे (पुणे) अध्यक्ष शेखर मुंदडा (राज्यमंत्री दर्जा) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून ते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त  डॉ. प्रवीण कुमार देवरे (भा.प्र.से.) आणि उरण मतदार संघाचे आमदार  महेश बालदी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींची मोठी मांदियाळी असणार आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर (चिरनेर गट), डॉ. मनिष पाटील (जासई गट) आणि  प्रेरणा पाटील (नवघर गट), श्रीम रीना घरत (जि. प. सदस्य, चाणजे गट), प्रियांका मढवी (चिर्ले गण), निर्मला घरत (जासई गण),  दीपक भोईर (मेंडखळ गण),  परेश ठाकूर (नवघर गण), प्रारंभी गावंड (आवेरे गण), कविता पाटील (चिरनेर गण),  कैलास भोईर (चाणजे गण), महेश म्हात्रे (केगाव गण) यांची सन्माननीय उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.

या शिबिरात पशुपालकांना तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून विविध मोफत सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. या शिबिरात जनावरांची गर्भ तपासणी, वंध्यत्व तपासणी व उपचार, गाई-म्हशींसाठी लाळ्या खुरकुत लसीकरण (८ वी फेरी), शेळी-मेंढीसाठी पी.पी.आर. लसीकरण, कोंबड्यांसाठी मानमोडी (आर. डी.) लसीकरण करण्यात येईल. श्वानांसाठी अँटीरेबीज लसीकरण व जंत निर्मूलन सुविधाही या शिबिरात उपलब्ध असेल. तसेच पशुपालकांना वंध्यत्व निवारण किट (खनिज मिश्रण, कॅल्शियम औषध) व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र दिले जाईल. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य डॉ. नितीन मार्कंडेय हे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायावर सखोल मार्गदर्शन करतील. 

या शिबिरासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अलिबाग यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. उरण तालुक्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी आपल्या जनावरांसह या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक महा एन. जी. ओ. फेडरेशन, इंडियन ऑइल आणि अदानी व्हेंचर्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.


कोट (चौकट ):- 

कार्यक्रमाची रूपरेषाः

सकाळी ९:०० ते १०:००: नाव नोंदणी

सकाळी १०:१५: गोपूजन व दीपप्रज्वलनाने उद्घाटन.

सकाळी १०:४५ ते ११:३०: प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन.

सकाळी ११:३० ते दुपारी २:००: जनावरांची प्रत्यक्ष तपासणी, उपचार आणि प्रशिक्षण सत्र समांतरपणे चालतील.

दुपारी १:१५ ते २:००: आभार प्रदर्शन व सर्व उपस्थित पशुपालकांसाठी भोजन व्यवस्था.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...