Friday, 13 March 2026

उद्योगश्री शांताराम धुरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुमधुर संगीत सोहळा संपन्न !

वसईत घुमले 'नाते स्वरांचे'

उद्योगश्री शांताराम धुरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुमधुर संगीत सोहळा संपन्न !

 वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

समाज उन्नती मंडळाचे मनोहर वाचनालय, धुरी परिवार आणि समर्थ मराठा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगश्री शांताराम महादेव धुरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वरांदी आर्ट्स प्रस्तुत 'नाते स्वरांचे' या योगेश केळवेकर निर्मित विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ७ मार्च रोजी सायंकाळी माणिकपूर येथील वाय.एम.सी.ए. सभागृहात रंगलेल्या या स्वराभिषेकाने वसईकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात दिग्गज गायकांनी आपल्या कलेचा आविष्कार सादर केला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर, त्यांच्यासोबतच श्रीरंग भावे, ब्रह्मानंदा पाटणकर, जयंत पिंगुळकर आणि 'छोटा पॅकेट मोठा धमाका' म्हणून ओळखली जाणारी बालगायिका स्वानंदी केळवेकर यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कलाकारांनी भावगीते, सुगम संगीत, कोळीगीते आणि लोकप्रिय चित्रपट गीतांचे सादरीकरण करून सभागृहात उत्साहाचे
वातावरण निर्माण केले. लोकमत सखी फेम गार्गी गोरेगावकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उत्कृष्ट निवेदन करून कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.

या सांगीतिक सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लोकनेते आदरणीय हितेंद्र ठाकूर आणि वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर आदरणीय अजीव पाटील आवर्जून उपस्थित होते. मान्यवरांनी धुरी परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि कलाकारांना शुभेच्छा दिल्या. वसईतील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुरी परिवाराचे शेखर धुरी, समाज उन्नती मंडळाचे विश्वस्त राजन वनमाळी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. स्मृतिदिनाचे औचित्य साधून सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी समर्थ मराठा संस्थेचे अशोक जाधव यांनी सर्व कलाकार, पाहुणे आणि रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...