Saturday, 16 May 2026

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !!

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !!

टिटवाळा, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना होत असलेल्या विविध समस्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत श्रद्धा गॅस एजन्सी विरोधात जोरदार प्रदर्शन करत गॅस पुरवठा सुरळीत करण्याकरिता निवेदन दिले. घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये होत असलेला प्रचंड विलंब, घरपोच सेवा नाकारणे, घरपोच शुल्क जादा आकारूनही ग्राहकांना स्वतः गोदामातून सिलेंडर आणण्यास भाग पाडणे, अधिकृत पावती न देणे तसेच ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासन आणि तेल कंपन्यांकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात असताना प्रत्यक्षात ग्राहकांना सिलेंडर मिळण्यासाठी तब्बल वीस ते बावीस दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. एवढ्यावरच न थांबता सिलेंडर वितरणानंतर पुन्हा तीस दिवस पूर्ण झाल्याशिवाय पुढील बुकिंग करता येणार नसल्याचे ग्राहकांना सांगितले जात असल्याने सामान्य कुटुंबांना वर्षभरात मिळणारे हक्काचे बारा सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरपोच वितरणासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असतानाही अनेकांना प्रत्यक्षात घरपोच सेवा दिली जात नसल्याचा आरोपही मनसेने केला आहे. अनेक ग्राहकांना सिलेंडर घेण्यासाठी थेट गोदामात जावे लागत असून, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास दादा भोईर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष दिनेश भोय यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील विधी व न्याय विभागाचे जयेश खंदारे ॲड. अविनाश शिळकांदे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे ॲड. अविनाश शेळकांदे दिलीप राठोड विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद ठाकरे, गिरीश यशवंतराव, समीर मेस्त्री तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !!

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !! टिटवाळा, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना होत ...