आजच्या राजकारणात अर्थकारण : गणेश नाईक.
आगरी समाजाचा मला सार्थ अभिमान : महेंद्रशेठ घरत
उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : "दुसऱ्याच्या आयुष्यातील सुख ओरबाडल्यास आपल्याला सुख लाभत नाही. त्यांना वातानुकूलित दालनातही घाम फुटतो. प्राणी असो वा माणूस आपल्या पोटच्या गोळ्याला कधीही कुणी पायदळी तुडवत नाही. एकेकाळी आगरी समाजाला खूप बदनाम केले गेले. मात्र तो काळ गेला, आज समाजाची प्रगती सर्वच बाबतीत निश्चितच चांगल्या प्रकारे होत आहे. स्वाभिमानाने आपला पुढे जात आहे. मी सामाजिक बांधिलकी जपून काम करीत आहे, मात्र आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही नाही," असे वनमंत्री गणेश नाईक पेण येथे म्हणाले. पेण येथे शुक्रवारी (ता. १५) अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था आयोजित राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन पार पडले. त्याचे उदघाटन वनमंत्री गणेश नाईक, आमदार रवींद्र पाटील, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "आगरी समाजाची ताकद मोठी आहे, परंतु समाज विखुरला आहे. आज आगरी समाज एकसंध झाला तर रायगड, ठाणे येथील सर्व आमदार, खासदार आगरी समाजाचेच होतील. मी जिल्हा परिषद सदस्य होताच सर्वप्रथम जलकुंभ उभारून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला. आगरी समाजासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करीत आलो आहे आणि करीतच राहीन. कारण आगरी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र दिबांचे नाव अद्यापही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे समाज पेटून उठला पाहिजे. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवायला हवी. आज आगरी समाजातील असंख्य तरुण, तरुण उच्च शिक्षण घेत आहेत, हे अभिमानास्पद आहे. आपला आगरी समाज स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनीही आगरी समाजावर अतोनात प्रेम केले. शिवरायांच्या काळातही आगरी समाजाचे योगदान अनन्यसाधारण आहे, मात्र आताच्या राज्यकर्त्यांना दिबांच्या नावाचा विसर पडला आहे. त्यांना आगरी समाजाचे योगदान कळत नाही. त्यामुळे येत्या काळात आगरी समाजाची एकजूट कायम हवी. नाही तर रात्र वैऱ्याची आहे, हे समाजातील नेत्यांनीही लक्षात घ्यावे. आगरी समाजासाठी मी काम करतो. समाजासाठी सर्वकाही सहकार्य करतो आणि यापुढेही करायला तयार आहे. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत असलो तरी माझी सही मी मराठीत करतो. आगरी माणसाने आगरी समाजाला साथ दिली पाहिजे. तरच समाज कुठेतरी जिवंत राहील."
यावेळी पेणचे आमदार रवींद्र पाटील, पुरुषोत्तम महाराज यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सूर्यकांत पाटील यांनी केले. यावेळी 'वारी देवाची' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
तबलावादक प्रताप पाटील, जगदीश पाटील, संजीवन म्हात्रे, तसेच समाजातील अनेक मान्यवर मंडळींचा यावेळी सत्कार करण्यात आला. आगरी समाजाचे कार्य म्हणून यावेळी दोन लाख रुपयांची देणगी महेंद्रशेठ घरत यांनी दिली.
"समाजाचे उपकार कधीही विसरणार नाही, ज्यांच्या नावात इंद्र आहे, ते महेंद्रशेठ घरत असे सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील म्हणाले. यावेळी 'माझा आगरी आगरी जाम हाय स्वाभिमानी' हे गाणे त्यांनी गाऊन रसिकांना जिंकले
No comments:
Post a Comment