मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षा साठी मोफत वर्षभर मार्गदर्शन !
उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) :
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे च्या पुढाकाराने व शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे "सुपर थर्टी" या उपक्रमा अंतर्गत बारावी सायन्स उत्तीर्ण मेडिकल आणि इंजीनियरिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत नीट व जेईई परीक्षेसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे हा उपक्रम देशभरात दहा ठिकाणी चालू आहे.
या उपक्रमा अंतर्गत उरण तालुक्यातील विज्ञान शाखेच्या सर्व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य/शिक्षक यांची एक बैठक घेऊन उपक्रमाची माहिती दिली. बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रकल्पाची माहिती दिली.बारावी उत्तीर्ण झालेल्या मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे सुपर थर्टी या उपक्रमांतर्गत वर्षभर निवासी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गरीब व गरजू इच्छुक विद्यार्थ्यांतील गुणवंत तीस विद्यार्थी नीट साठी व तीस विद्यार्थी जेईई परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षा घेऊन निवडले जातील. परीक्षा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेचे गुण व विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी निवासी प्रशिक्षण दिले जाईल, त्यामध्ये अभ्यासक्रम शिकविणे, उजळणी परीक्षा, गृहपाठ, शंका निरसन, सराव परीक्षा इत्यादी तयारी करून घेतली जाईल.
सुपर थर्टी साठी इच्छुक विद्यार्थी व त्यांचे पालक यांची बैठक दिनांक २० मे रोजी सकाळी साडेदहा वाजता वीर वाजेकर महाविद्यालयात आयोजित केलेली आहे. पालकांना या उपक्रमाची माहिती दिली जाईल व त्याच वेळेस विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया परीक्षा ही घेतली जाईल.
मेडिकल व इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व दिनांक २० मे रोजी महाविद्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन शोभा मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने आशिष गुप्ता व डॉ. आमोद ठक्कर प्रभारी प्राचार्य वीर वाजेकर महाविद्यालय, फुंडे, उरण, यांच्याकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment