*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ साली स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिवस आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व संस्थेचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब अध्यक्षस्थानी होते. तसेच संस्थेचे विश्वस्त-सचिव डॉ. वासुदेव गाडे, पद्मश्री उज्वल निकम, ऍड. बि. के. बर्वे, श्री. अरविंद सोनटक्के, डॉ. वेंकटस्वामी, विपश्यनाचार्य भदंत्त राहुल बोधी व कार्यकारी समितीचे सदस्य श्री. चंद्रशेखर कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे यांनी केले.
मागिल ४ वर्षांपासून या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिग्गजांना, महामहीम राज्यपाल व पीईएसचे अध्यक्ष सन्माननीय आठवले साहेबांच्या हस्ते *'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार'* देऊन सन्मानित करण्यात येते. ती परंपरा कायम ठेवत आजदेखील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व कला- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या अनेक मान्यवरांचा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार -२०२६' देऊन त्यांना राज्यपाल व आठवले साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यामध्ये राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र विधानसभेच्या माजी उपसभापती श्रीमती निलमताई गोऱ्हे, पद्मश्री अशोक (आबा) खाडे साहेब, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ विनय राऊत, सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश खानविलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालवाडी, कोल्हापूरचे संचालक श्री. नंदकुमार गोंधळी, के. जे. सोमय्या विद्याविहार कॉलेजचे प्राचार्य डॉ. किसन पवार, सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विजय मोहिते, महापरिनिर्वाण समन्वय समितीचे सचिव श्री. नागसेन कांबळे, तसेच सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे व प्राध्यापक डॉ. विजय मोरे इत्यादीना, प्रमुख पाहुणे महामहीम राज्यपाल व संस्थेचे अध्यक्ष आठवले साहेबांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांनी त्यांच्या भाषणात, आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली, सर्व विश्र्वस्तांच्या सहकार्याने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या देशभरातील विविध शाळा,महाविद्यालये व वसतीगृहांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे केले जात असल्याबद्दल त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. तसेच आठवले साहेबांनीदेखिल त्यांच्या भाषणातून संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा थोडक्यात सादर केला. पीईएसच्या सर्व शाळा महाविद्यालयाचा कार्यभार संस्थेचे सचिव व सर्व विश्र्वस्तांच्या देखरेखीखाली मुख्याध्यापक / प्राचार्य चांगल्या प्रकारे चालवत आहेत त्याबद्दल आठवले साहेबांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पीईएसच्या शाळा व महाविद्यालये सुरू करून बहूजन समाजातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारीत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल असेही आठवले साहेबांनी जाहीर केले.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वासुदेव गाडे साहेबांनी केल, स्वागतपर भाषण ऍड. उज्वल निकम साहेबांनी केले व ऍड. बि. के. बर्वे साहेबांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले व सर्वांचे आभार मानले. महामहीम राज्यपालांचे स्वागत आठवले साहेबांनी शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केले व आठवले साहेबांचे स्वागत पद्मश्री उज्वल निकम साहेबांनी केले. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व विश्वस्तांचे स्वागत पीईएसच्या कार्यकारी समितीचे सदस्य श्री. चंद्रशेखर कांबळे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून श्री चंद्रशेखर कांबळे सोबत त्यांचे सहकारी प्रशांत मोरे, धर्मराज ब्राम्हणे व अश्विन वाघ हे प्रत्येक शाळा महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या सर्व शिक्षक कर्मचारी व काही विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी विनंती /आव्हान करत होते. त्याला सिबीडी बेलापूर येथील शाळेचे मुख्याध्यापक, महाड कॉलेजचे प्राचार्य व सिद्धार्थ वाणिज्य व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चांगला प्रतिसाद देऊन त्यांचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती नोंदवली आणि पीईएसचा ८१वा वर्धापनदिन यशस्वी करण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य केले, त्यांच्याप्रती बर्वे साहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली.
वृत्तांकन - अश्विनी निवाते
No comments:
Post a Comment