पेणतळे नळपाणी योजनेच्या पाईपलाईनचा वाॅल्व्ह लीकेज असल्याने लाखो लिटर पाणी वाया : ग्रामीण प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) सद्या वैशाख महिना सुरू असल्याने रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात सर्वत्र प्रचंड उष्णतेची लाट उसळली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून अक्षरशः आग ओकणार्या सूर्याच्या प्रचंड असह्य उष्णतेमुळे तालुक्यातील वातावरणात सर्वत्र रखरखीत उष्णतेचा वैशाख वणवा पसरला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सूर्याच्या प्रचंड उष्णतेमुळे माणगांव तालुक्यातील पाणी टंचाई ग्रस्त गावातील पाण्याचे स्रोत आटले असून विहिरी आणि नदी नाल्यांनी अक्षरशः तळ गाठला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात गावागावात भीषण पाणी टंचाई मुळे पाणीबाणी निर्माण होणार त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाई ग्रस्त गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गंभीर भीषण परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाणी पुरवठा करणार्या नळपाणी योजनेच्या पाईपलाईनचा वाॅल्व्ह लीकेज असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
या बाबत सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे. रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पेण तर्फे तळे, बोरघर आणि आमडोशी या ती गावात पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने गेल्या अनेक वर्षात अनेक सरकारी योजनांच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून चेरवली आणि पेण तर्फे तळे गावच्या हद्दीत नदीच्या तीरावर पाणी साठवण विहीर बांधून त्या विहिरीतून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेण, बोरघर आमडोशी या तीन गावांमध्ये पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात आला आहे. पुढे काही वर्षांनी बोरघर गावाला बोअरवेल च्या माध्यमातून मुबलक पाणी लागल्याने बोरघर गावाने आपला पाणी पुरवठा पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीला खंडीत करायला सांगितला. त्या नंतर सद्या या नळपाणी योजनेचा लाभ पेण तर्फे तळे आणि आमडोशी हे दोन गाव घेत आहेत. या नळपाणी योजनेच्या माध्यमातून या दोन गावातील भीषण पाणी टंचाईच्या समस्येतून काही प्रमाणात सुटका झाली आहे.
परंतू या नळपाणी योजनेच्या पाईपलाईनचा वाॅल्व्ह चेरवली गावच्या हद्दीतून पुढे नाईटणे गावाकडे जाणाऱ्या कालव्याचे पाणी ज्या ठिकाणी नदीच्या खालून जाते त्या ठिकाणी गेली अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लीकेज असल्याने या लीकेज वाॅल्व्ह च्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या गंभीर बाबीकडे ग्रामीण प्रशासनातील कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे या घटनेतून ग्रामीण प्रशासनाचा बेजबाबदार पणा आणि अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची बाब समोर आले आहे.
No comments:
Post a Comment