रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महाड, श्रीवर्धन आणि तळा तालुक्यात कोरोनाची एन्ट्री हा ग्रामीण जनतेला सावधानतेचा इशारा
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) चीन मधील हुआन येथून उगम पावलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण संपूर्ण जगात पसरले आणि बघता बघता त्याने संपूर्ण जगात मृत्यूचे थैमान घातले. संपूर्ण जगात हाहाकार माजवणार्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून भारत देखील सुटला नाही. भारतातील अनेक राज्ये आणि राज्यातील जिल्हे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संक्रमित झाले आहेत. आता दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव भारताच्या कानाकोपऱ्यात आणि ग्रामीण भागात देखील होत चालला आहे.
याचे उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई, पनवेल आणि उरण येथे येऊन स्थिरावलेल्या कोरोना विषाणूची घातक एन्ट्री तथा आगमनरुपी संचार आता मुंबई मधून मोठ्या प्रमाणात आपापल्या गावाकडे येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून गावाकडे होऊ लागला आहे. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माणगांव, श्रीवर्धन आणि तळा तालुक्यात झाले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुंबई मधून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन महाड तालुक्यातील बिरवाडी, कोकरे, श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते आणि आता तळा तालुक्यातील तळेगाव येथे आलेल्या लोकांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव आली. आणि काही दिवसातच यातील काही रुग्णांना उपचारा दरम्यान कोरोना विषाणूने आपली शिकार केले. या घटनेनंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यासह या तालुक्यातील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार म्हणजे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेला कोरोना विषाणूची धोक्याची घंटा तथा पूर्वसूचना असून या घटनेतून ग्रामीण भागातील जनतेने आतातरी कोरोना विषयी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा विनाश अटळ आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. या मध्ये शारिरीक अंतर तथा सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क आणि हैन्ड सॅनिटाइजर चा वारंवार वापर, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन टाळणे त्याच बरोबर सरकारी लाॅकडाऊन संचारबंदीचे कुठेही कुणीही उल्लंघन न करणे इत्यादी बाबींचे तंतोतंत आणि काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे केले तर आणि तरच आपण कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखून त्याची विनाशकारी संक्रमण साखळी खंडीत करून आपण कोरोना विषाणूचा पराभव करून शासनाने कोरोना विषाणूच्या विरोधात उभे केलेले हे कोरोना विषाणू मुक्तीचे ही लढाई आपण जिंकू शकतो अन्यथा नाही.
No comments:
Post a Comment