Saturday, 9 May 2020

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी, शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त...

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी, शिक्षण सम्राट  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिना निमित्त..... 
       कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात कुंभोज या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. जैन कुटुंबात जन्म झाल्याने जैन मुनींची सत्य आणि अहिंसेची जाण त्यांच्या ठिकाणी होती. भाऊराव पाटलांचे व्यक्तिमत्व स्वयंभू होते. त्यांना मिळालेले मोठेपण, लौकिक स्वकष्टाने व जनसेवेमुळे मिळाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे कर्मवीरांचे प्रेरणास्थान होते पण त्याचबरोबर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. शाहू महाराजांच्या भेटीनंतर महाराजांच्या सामाजिक सुधारणांपैकी बहुजन समाजाच्या शिक्षणप्रेमाचा सगळय़ात जास्त परिणाम भाऊरावांच्या मनावर झाला. भाऊराव जैन समाजातील असतांना सुद्धा त्यांना अस्पृश्योद्धाराचे वेध लागले होते. गरीब शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे हे त्यांचे ध्येय होते. उगवत्या ग्रामीण तरुण पिढीसाठी रचनात्मक शैक्षणिक सोयी सवलती उपलब्ध करून देणे हे भाऊरावांचे स्वप्न होते. या आपल्या शेतकर्‍यांच्या मुलांना शिकवून शहाणे केल्याखेरीज अज्ञानाचा अंधकार दूर होणार नाही हे जाणून अण्णांनी भावी कार्याची रूपरेषा आखली आणि ४ आक्टोबर १९१९ ला 'रयत शिक्षण संस्थेची' स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहून त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात येते. पुढे सातारा येथे 'छत्रपती शाहू बोर्डींग हाऊस' या नावाने त्यांनी वस्तीगृहाची स्थापना केली. नवनवीन कार्याची आव्हाने स्वत:च उभी करायची व ती स्वत:च यशस्वी करून दाखवायची हे भाऊरावांचे स्वभाव वैशिष्ट्य. भाऊरावांनी सातारच्या शाहू महाराजांची बरीच वर्षे ओस पडून असलेली अकरा एकर अडतीस गुंठय़ांची 'धनिनीची बाग' खंडाने घेतली. तेथे मुलांसाठी चहू बाजूंनी झोपड्या बांधल्या व मधल्या जागेत भाजीपाला पिकविण्यास सुरुवात केली. खर्‍या अर्थाने 'स्वावलंबी शिक्षण व 'कमवा व शिका' चा हा प्रयोग होता. त्यांनी वस्तीगृहाच्या माध्यमातून स्वाभिमानी, आत्मनिर्भर अशा तरुणांच्या पिढय़ा तयार केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील आयुष्यभर शिक्षण प्रसाराचे काम करत राहिले. पुढे त्यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करतांना भाऊराव पाटील स्थानिक शेतकर्‍यांना मुलांच्या कमवा व शिका योजनेसाठी पडीक जमिनी मागत असत व त्या पडीक जमिनीची मुलांतर्फे मशागत करून त्या जमिनीत पिके घेत असत.

*पत्रकार- विश्वास बळीराम गायकवाड बोरघर / माणगांव रायगड भ्र.ध्व. ८००७२५००१२*
                
         छत्रपती शिवाजी महाराज हे कर्मवीर अण्णांचे प्रेरणास्थान. त्यांच्या स्मरणार्थ १९४७ साली सातारा येथे त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयामध्ये ध्येयवादी व कर्तृत्ववान रयतसेवक निर्माण व्हावे हे भाऊरावांचे ध्येय होते. एका धनिकाने भाऊरावांना शिवाजी महाराजांचे नाव बदलून महाविद्यालयास आपले नाव देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपये देऊ केले. तेव्हा भाऊराव म्हणाले, 'एक वेळ मी माझ्या जन्मदात्या बापाचे नाव बदलेल, पण कॉलेजला दिलेले महाराजांचे नाव कदापी बदलणार नाही'. महाराजांवर भाऊरावांची केवढी ही श्रद्धा.
            भाऊराव हे मानवतेचे पुजारी, सामाजिक मुक्तिचे पुरस्कर्ते, शिक्षणाचार्य होते. लोकशिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हा त्यांचा ध्यास होता. 'रयतेचे सेवक' ही पदवी ते स्वत: सहीखाली नेहमी लिहीत. पण जनतेने त्यांना 'कर्मवीर' ही पदवी बहाल केली आणि खर्‍या अर्थाने त्यांचा सन्मान केला. 
     असा हा महान समाजसेवक आपल्या कार्याचा अमुल्य ठेवा आपल्या पदरात टाकून, ग्रामीण शिक्षणाची नवी दिशा दाखवून ९ मे १९५९ रोजी अंतर्धान पावला. रयतेच्या या सेवकास त्यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन......

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...