Thursday, 25 June 2020

गुन्हेगारीचे आगार धुळे !!

गुन्हेगारीचे आगार धुळे !!


"धुळे जिल्हा हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमारेषांशी संलग्न असा जिल्हा आहे. तीन राष्ट्रीय महामार्ग असलेला धुळे जिल्हा अलिकडच्या काळात गुन्हेगारीचे आगार झाला आहे."

धुळे - मागील दहा दिवसांचे वर्तमानपत्र चाळले तर लक्ष्यात येईल की चार तालुके असलेला राज्यातील धुळे जिल्हा हा किती कारणांनी प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या रूग्णसंख्येत वाढ होण्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून बाहेर येत आहेत. तर धुळे जिल्ह्यात गांजा, अवैध मद्य, गुटका, अवैध पिस्टल, काडतूस, रेती, कत्तलीसाठी जाणारी गुरे, दरोडेखोर अशा बातम्यांना उत आला आहे. अर्थात अशा अवैध व्यवसाय करणार्‍या पांढर्‍या बगळ्याची मागील तीन महिन्यात झालेली आर्थिक नुकसानीची भरपाई होणे महत्वाचे आहे. त्यामुळे खाकी वर्दीच्या सहकार्यातून ते होते आहे. हे व्यवसाय या राज्यातून त्या राज्यात होण्यासाठी धुळे जिल्हा मात्र ‘सरहद्द’ किंवा ‘बॉर्डर’ ठरला आहे. गंमत अशी आहे की गुजरात राज्यात गांधीच्या जन्मस्थळामुळे दारूबंदी आहे तर मध्यप्रदेशात गांजावर बंदी नाही आणि गुजरात व मध्यप्रदेशात गुटकाबंदी नसून महाराष्ट्रात गुटकाबंदी आहे. म्हणजे सरकारची धोरणेसुध्दा अवैध, तस्करीसाठी किती पूरक असतात हे लक्ष्यात घेणे महत्वाचे आहे. आणि आपण विनाकारण खाकी वर्दीला दोषी ठरवत असतो. त्यातच मालेगांव आणि भिवंडी, मुंबईसाठी बारा नंबरचे मालाचा पुरवंठा हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून होत असतो. जळगांव आणि नंदुरबार जिल्हे हे धुळे जिल्ह्याचे साडूभाउ असल्याने या जिल्ह्यातील पांढरे बगळेही या तस्करीत मोठ्या प्रमाणावर सामिल असतात. अर्थात पांढरे बगळ्यांना सत्ता आणि संपत्तीमुळे प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. मग खाकी वर्दीतला कितीही ‘दबंग’ अधिकारी या जिल्ह्यांमध्ये आला तरी त्याला या पांढर्‍या बगळ्यांना ‘सलामी’ ठोकावी लागते आणि इथूनच खर्‍या अर्थाने अवैध व्यवसायालया ‘हिरवी झेंडी’ मिळते. त्यामुळे एक दोन सिनेमामध्ये पोलीस अधिकार्‍याला धुळ्याला बदली करून टाकीन असा एक संवाद आहे. जो आम्ही हसण्यावारी घेत असतो. मागील काळत झालेल्या हत्याकांडांची मालिका ज्याचा उल्लेख आम्हाला या ठिकाणी करावयाचा नाही, त्यामुळे धुळे जिल्हा कंलकित आणि बदनाम झालेला आहे. असे म्हटले जाते की, या जिल्ह्यात काय बनवल जात नाही? या जिल्ह्यात जशीची तशी विदेशी मद्याची निर्मिती केली जाते. ट्रकांनी भांगेची वाहतूक आणि साठवणूक केली जाते. डुप्लिकेट डांबर इतकेच नाही तर शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत डुप्लिकेट रासायनिक खतांची निर्मिती, बोगस बियाणे, बोगस ताडी, हातभट्टीच्या दारूची तर संख्याही सांगता येणार नाही, रासायनिक दुध, मावा, पेढे पनीर, शुद्ध तुपात डालडा तूप मिश्रण करणारे उद्योग, शेगंदाणा तेलात सरकीचे तेल पामतेल मिश्रण करण्याचे उद्योग, इतकेच नव्हे तर चटणी, हळद यामध्ये रंग मिश्रण करणे धान्यात, शेंगदाण्यात लालखडे, पांढरेखडे मिक्स करणे, गव्हाच्या पिठात मक्याचे पीठ मिक्स करून पॅकींग करणे, असे अनेक उद्योग या जिल्ह्यात सुरक्षेच्या नावाखाली गेटवर दोन - दोन गार्ड उभे करून आतमध्ये केले जातात. आणि बाहेर पोलीसांची एखादी गाडी सायरन वाजत निघून जाते. दुसर्‍या राज्यातील दरोडेखोर, चोर धुळे जिल्ह्यात चोर्‍या करून चार तासात राज्याच्या सिमा ओलांडतात आणि आमचे कुत्रे पांझरेपर्यंत हुंगत जावून मुख्यालयात परत येतात. मग तो बँकेचा दरोडा असो किंवा अंडग्राऊड केबल चोरीचे धाडस असो. पांढरे कपडे घालून समाजात वावरणार्‍या वेगवेगळ्या जातीच्या पांढर्‍या बगळ्यांनी पोलीसांची वर्दी कलंकित करून टाकलेली आहे. अलिकडे पोलीसांनाही चोर्‍या मार्‍या, मोटर साईकल चोरी, स्नॅचिंग सारख्या केसेसमध्ये हात घालायला ‘इंटरेस्ट’ वाटत नाही. अशा गुन्ह्यांची नोंद करून पोलीस रजिस्टर विनाकारण भरण्याचेही पोलीसांना आवडत नाही. मोठे हत्याकांड, रॉबरी, गावातील दोन पुढार्‍यांची दंगल, दरोडा अशा चॅलेजिंग केसेसच पोलीसांना अलिकडे आवडतात. अन्यथा एके काळी पाकिटमार चोरीची सुद्धा नोंद व्हायची. वाहनचोरी हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावर वेगळा अग्रलेख होऊ शकतो. परंतू गेल्या आठवड्यात शिरपूर तालुक्यात पकडला गेलेला 180 पोती दोन कोटींचा गांजा, लाखो रूपयांची दर दोन दिवसाआड सापडणारी लाखोची अवैध विदेशी मद्याची खोकी डोक्याला झिणझिण्या आणणारी आहे. आणि हे असेच सुरू राहणार आहे. त्यामुळे यासाठी पोलीसांना बदनाम करण्याची आवश्यकता नाही. ‘पानी सामनेसे बह रहा है, और प्यासा रखवालदार वो पानी भी ना चखे यो तो बडी नाइन्साफी होगी’. म्हणून उठसुठ पोलीसांना बदनाम करून गेंड्यांची कातडी असलेल्या आणि समाजाने प्रतिष्ठित केलेल्या या पांढर्‍या बगड्यांच्या या व्यवसायांना ‘राजकीय आशिर्वाद’ असतो. अर्थात नवापूर आणि निझर व्हाया साक्री किंवा नंदुरबार मार्गे महाराष्ट्रातील, मध्यप्रदेशातील विदेशी मद्य ज्याला एक्साईज ड्युटी लागत नाही, मोठ्या प्रमाणावर संपूर्ण गुजरात राज्याची तहान भागेल इतक्या प्रमाणात दररोज ट्रकांनी तर जातोच. परंतू झायलो, टाटा सुमो, इनोवा सारख्या गाड्यांमधून सुद्धा हे अवैध मद्य गुजरातची तहान भागवत असते. भांग, गांजा आणि गुटका खाणार्‍यांची एक मोठी जताम असते. त्यामध्ये हमालापासून तर महाविद्यालयीन तरूणांपर्यंत लाखोंच्या संख्येने या व्यसनाचे ग्राहक आहेत. त्यांना ते खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. अशा वर्गासाठी गुजराथ मधून आणि मध्यप्रदेशातून एसटी, लक्झरी, ट्रकांमधून या पदार्थांची अवैध तस्करी केली जाते. गुजराथ मधून बोगस बियाणे, खते, पेस्टीसाईडस् महाराष्ट्रात आणि मध्यप्रदेशात पाठविली जातात. मध्यप्रदेशातून भांग मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आणला जातो. या सर्व वाहतुकीसाठी महामार्ग हे धुळ्यावरून जातात. त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खाकी वर्दीला ‘सॅल्यूट’ केल्याशिवाय गाड्या पुढे जात नाही. रात्रीच्या अंधारात चालणारा हा व्यापार करोंडोंच्या घरात आहे. त्यामुळे पोलीसांना रात्री ‘जागरण’ करावे लागते. महामार्ग आता सोयीचे झाले आहेत. इंदौर वरून निघालेली गाडी अमदाबाद, सुरत मध्ये अवघ्या दहा तासात पोहचते. परंतू यासाठी, शेदंवा, शिरपूर, नरडाणा, सोनगीर, धुळे, साक्री, पिंपळनेर, सारखी पोलीस स्टेशन ही महत्वाची ठरलेली आहेत. लोकांना आवश्यक असणार्‍या सर्व बाबी या ‘अवैध’ मार्गाने उपलब्ध होतात. त्यामुळे त्या बंद होतील अशी आशा बाळगणे मुर्खपणाचे ठरेल. परंतु एक मात्र नक्की यात बेरोजगार तरूणाईचा वावर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. जो भविष्यासाठी मोठा धोका निर्माण करणारा आहे. पोलीस प्रशासनाने यात लक्ष्य घालावे असे म्हणावेच लागेल. कारण संरक्षणाची जबाबदारी आम्ही खाकी वर्दीलाच सोपविलेली आहे. यातून किती विष बाहेर पडेल सांगता येणार नाही. मात्र या विषाने समाज पोखरला जाईल आणि तरूणाई नाचविली जाईल हे सत्य नाकारता येणार नाही. एव्हढेच.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...