बुधवारपासून कल्याण-डोंबिवली खुले !
सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहणार
ठाणे/कल्याण : साधारण अडीच महिन्याच्या काळानंतर ठाण्यासह कल्याण-डोंबिवली शहरात टाळेबंदीतील सर्व नियमांचे काटेकोर पालन करून बुधवारपासून दुकाने आणि बाजारपेठा सुरू होत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना खरेदीसाठी परवानगी दिली आहे. यातून मॉल, केशकर्तनालय, सौंदर्य सुविधा केंद्रांना वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ३० जूनपर्यंत ही मुभा असेल, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेशात म्हटले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील ६५ दिवसांपासून पालिका हद्दीतील सर्व व्यवहार बंद आहेत. हार्डवेअर, कपडे, इलेक्ट्रिक, झेरॉक्स, शालेय सामग्री विक्रीची दुकाने खुली करावीत म्हणून रहिवाशांकडून, व्यापारी संघटनांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. व्यवहार सुरू करण्याचे शासनाने आदेश काढून दोन दिवस उलटले तरी जिल्हा महसूल विभाग, स्थानिक पालिका प्रशासन व्यवहार सुरू करण्याचे आदेश काढत नसल्यानेव्यापाऱ्यांमधील अस्वस्थता वाढत चालली होती. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व व्यवहार काही अटी शर्तीवर सुरू करण्यास मुभा देण्याचा आदेश जाहीर केला. ३ जूनपासून (बुधवार) या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने महापालिका हद्दीतील बाजारपेठा करोना संसर्गाचे नियम, आदेश पाळून सुरू होणार आहेत. रस्त्याच्या दुतर्फाची दुकाने सम, विषम (पी-१, पी-२) नियमाने सुरू होतील. सम, विषम तारखेची दुकाने सुरू करण्याचा निर्णय प्रभाग अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एकत्रित बैठकीत घ्यायचा आहे. दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेत सुरू राहतील. रात्री नऊ ते पहाटे पाच वेळेत नागरिकांना बाहेर फिरण्यास मज्जाव असेल.
No comments:
Post a Comment