ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन मधे शिथिलता !
ठाणे : करोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीविरोधात नागरिक, व्यापारीवर्गातून नाराजीचा सूर व्यक्त होत असतानाच, ठाणे जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांनी सोमवारपासून निर्बंध शिथिल केले आहेत.
ठाणे महापालिकेपाठोपाठ कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांनीही केवळ अतिसंक्रमित क्षेत्रांपुरते कडक निर्बंध कायम ठेवून अन्यत्र दुकाने व व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. ठाणे जिल्हा प्रशासनानेही तशाच प्रकारचे आदेश काढून भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही दिलासा दिला.
ठाणे जिल्ह्य़ात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ जुलैपासून टाळेबंदी लागू करण्यात आली होती. १२ जुलै रोजी टाळेबंदीची मुदत संपुष्टात येणार होती. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने १९ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढविली होती. मात्र, या टाळेबंदीबाबत नागरिक आणि व्यापारीवर्गातून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला होता. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकाने थेट खुली करण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी कल्याण-डोंबिवली, भिवंडी तसेच नवी मुंबई महापालिका प्रशासनांनी सरसकट टाळेबंदी हटवून केवळ अतिसंक्रमित क्षेत्रांपुरतेच कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे या शहरांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने सम-विषम पद्धतीनुसार सुरू राहणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करतानाच शहरातील ४२ अतिसंक्रमित क्षेत्रांची यादी जाहीर केली असून त्या भागांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. कल्याण-डोंबिवलीत फडके मैदान, गोविंदवाडी, टिळकनगर, देवीचा पाडा, विष्णूनगर, जुनी डोंबिवली यांसह अनेक अतिसंक्रमित परिसरात ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
अंबरनाथ नगरपालिका, कुळगाव-बदलापूर नगरपालिका तसेच मुरबाड आणि शहापूर नगरपंचायत क्षेत्रासह अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागामधील प्रतिबंधित क्षेत्रामध्येच ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्यात आली असून यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रविवारी काढले आहेत. या सर्वच ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सम-विषम पद्धतीनुसार सुरू राहणार आहेत. जिल्ह्य़ात टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रामध्ये २२ जुलैला टाळेबंदीची मुदत संपणार असून या ठिकाणी टाळेबंदीबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment