रेस्क्यू टीमने पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या सोन्याच्या वाडीतील ८६ लोकांचे केले सुखरूप रेस्क्यू ऑपरेशन !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागात असलेल्या सोन्याच्या वाडीत पुराचे पाणी शिरले आहे. या वाडीला पुराव्या पाण्याने वेढा दिल्याने सदर वाडीतील शेकडो लोक अडकून पडले होते. त्यांना वाचविण्यासाठी रेस्क्यू टीम येथे दाखल झाली असून रेस्क्यू टीमने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु केले असून त्यांनी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या एकूण ८६ लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रायगडकरांची दाणादाण उडवली असून जिल्ह्यात सर्वत्र पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी, माणगाव तालुक्यातील काळ आणि गोद नद्यांनी आपले पात्र ओलांडल्याने महाड, माणगाव मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागात असलेल्या सोन्याच्या वाडीला आज ०५ ऑगस्ट पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे सोन्याच्या वाडीतील पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनासह, रेस्क्यू टीम माणगांव गोरेगाव मध्ये दाखल झाली असून सदर रेस्क्यू टीमने बोटीद्वारे अडकून पडलेल्या ८६ लोकांना सुखरूप बाहेर काढले.

No comments:
Post a Comment