तांबडी प्रकरणातील पिडीत मुलीच्या कुटूंबाच्या सांत्वनासाठी आमदार विनायकराव मेटे बुधवारी रोह्यात - "जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत"
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) संपूर्ण मानवजातीला कलंक लावणारी घटना नुकतीच २६ जुलै रोजी रोहा तालुक्यातील तांबडी ह्या गावी घडली . नराधमांच्या एका समूहापुढे एक निष्पाप मुलगी बळी पडली. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला हादरवणाऱ्या अशा घटनां आणि त्या नीच प्रवृत्ती नक्कीच निषेधार्थ आहेत. अशा ह्या हीन वृत्तीच्या विकृत जीवनशैलीचा कडक बंदोबस्त शासन दरबारी झालाच पाहिजे ह्याबद्दल कोणाचेही दुमत नसावे.
शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन समाजासाठीही शासन दरबारी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत कार्यरत असणारे आणि मराठा आरक्षण सोबतच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी कार्यरत असणारी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष मा. आमदार विनायकराव मेटे हे आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत सदर पिडीत कुटुंबियांच्या सांत्वनासाठी व त्याचबरोबर रोहा तालुक्यातील सर्व समाजबांधवांसोबत संवाद साधण्यासाठी बुधवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रोहा येथे येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश सावंत ह्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता रोहा येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे प्रथम आगमन होईल. येथे सकल मराठा समाज रोहा तालुका ह्यांच्या सोबत तालुक्यातील व परिसरातील अनेक सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, सर्व समाजबांधव, अनेक संघटनांचे मान्यवर पदाधिकारी व त्यांचे सर्व सहकारी ह्यांच्याशी सुसंवाद व चर्चात्मक विचारविनिमय करून समाजापोटी अधिकाधिक वास्तववादी योगदान कसे दयावे लागेल, कोणती दिशा ठरवावी लागेल, काय ध्येयधोरणे असावेत ह्यांवरती फक्त एक समाजबांधव म्हणूनच ते सर्वांशी बोलणार आहेत. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांसोबत ते तांबडी येथे पिडीत मुलीचे वडील श्री. रणजित म्हांदलेकर ह्यांच्या घरी सांत्वनपर भेट घेणार आहेत.
सदर दौऱ्याप्रसंगी त्यांच्यासोबत मराठा समन्वय समितीचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी, शिवसंग्रामचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. तानाजीराव शिंदे, सरचिटणीस विक्रांतजी आंब्रे, प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, जिल्हा सरचिटणीस अनंत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष आप्पा सत्वे, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, छत्रपती युवा सेनेचे गणेश कदम, छावा मराठा युवा संघटनेचे रवींद्र काळे, राष्ट्रीय छावा संघटनेचे गंगाधर काळकुटे, छावा श्रमिक सेनेचे ज्ञानेश्वर गायकवाड, शिव क्रांती सेनेचे संजय सावंत, अ. भा. मराठी युवा परिषदेचे शरद तुंगार, बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय घाटनेकर पाटील तसेच रोह्याचे आणि विविध संघटनांचे मान्यवर व सर्व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत असेही श्री. अविनाश सावंत यांनी पत्रकात म्हटले आहे.

No comments:
Post a Comment