मुरबाड तालुक्याच्या दुर्गम भागात सुरू झाली कोविड शाळा !!
मुरबाड (मंगल डोंगरे) :
गेल्या चार महिन्यापासून सर्वत्र लॉकडाउन असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यात शाळा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी माळशेज घाट पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाडीवर स्थानिक सुशिक्षित तरुण - तरुणांनी कोविड शाळा ह्या नावाखाली शाळा सुरू करून स्थानिक विद्यार्थी आप- आपल्या वाडीवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
खरे तर शहरी भागातील शाळेत ऑनलाईन शिक्षण दिले जाते. मात्र मुरबाड सारख्या दुर्गम तालुक्यात ते शक्य नसल्याचे हेरून माळशेज घाट पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यापैकी वाघवाडी, शिरवाडी, केव्हारवाडी, भेरेवाडी, दिवानपाडा, मोहवाडी ह्या सात वाड्यावरील १०वी १२वी उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींनी १ ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी वाडीतील अंगणवाडी किंवा समाजमंदिरात शिक्षण देण्याचं काम सुरू केले आहे. वाडी वस्त्यावर अद्याप पावेतो कोरोना पोहचला नसल्याने ह्या कोविड शाळांना पालकवर्ग,आणि मूलं देखील मोठ्या संख्येत उपस्थित राहत आहेत. माञ ह्या १ ते ७ वीच्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध नसल्याने शासकिय शाळेमध्ये कपाट बंद अवस्थेत असलेले साहित्य मिळवण्यासाठी काही समाजसेवी संस्था पालक वर्ग प्रयत्नशिल आहेत. विशेष म्हणजे तालुक्यापासून २५ ते ३० कि. मी अंतरावरील या दुर्गम वाड्या पाड्यावरील सुशिक्षित तरुणांच्या या उपक्रमाचा आदर्श घेऊन इतर गाव पाड्यावर असे तरुण स्वताहून सरसावले तर शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबण्यास मदत होईल.

No comments:
Post a Comment