भाईंदर येथे फाटक मार्गावर बेकायदा वाहनतळ !!
"महानगरपालिका व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष"
भाईंदर : शहराच्या पूर्वेला मुख्य फाटक मार्गावर दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे नागरिकांसाठी मोठे दिव्य ठरत आहे. या भागात वाहतूक कोंडी ही नित्याची बाब ठरली आहे. या मार्गावरील बेकायदा वाहनतळाकडे मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
भाईंदर फाटक मार्गाचा वापर अधिक प्रमाणात होतो. या मार्गावरून भाईंदर रेल्वे स्थानक आणि मीरा-भाईंदर मार्गाकडे जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गाच्या दुतर्फा वाहन दुरुस्तीची दुकाने आहेत. त्यामुळे येथे मोठय़ा संख्येने वाहने येतात. ही वाहने रस्त्याच्या मधोमध लावली जातात. याशिवाय या भागात औद्योगिक वसाहती असल्याने अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे खासगी वाहनांना अडथळा निर्माण होतो. नागरिकांची सोय करण्याकरिता प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणाचे तसेच बेकायदा वाहने हटवण्याचे धोरण हाती घेण्यात आले होते. परंतु करोनाकाळात ही कारवाई ठप्प झाल्याने वाहनतळे उभी आहेत.
वाहतूक विभागाच्या वतीने शहरात बेकायदा वाहनतळांवर कारवाई सुरूच आहे. तसेच फाटक परिसरातही तातडीने कारवाई केली जाईल.
-मंगेश काढ, साहाय्यक पोलीस निरीक्षक काशिमीरा वाहतूक विभाग

No comments:
Post a Comment