पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने तारिक गार्डन दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना ६४ लाख रुपये मंजूर !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील महाड येथे दिनांक २४ ऑगस्ट रोजी तारिक गार्डन ही पाच मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १६ व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्या व्यक्तींच्या कुटुंबियांना/वारसांना मदत देण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांना रुपये ६४ लक्ष रुपये मंजूर करून हा निधी वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही मदतीची रक्कम मयत व्यक्तींच्या वारसांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी हा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला होता, याकरिता त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे विशेष आभार मानले आहेत.
शेतामध्ये कीटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधेच्या घटना, धार्मिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना व मोडकळीस आलेल्या जीर्ण झालेल्या इमारती खाली करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने रहिवाशांना नोटीस दिलेली नाही अशा अधिकृत निवासी इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये मृत व जखमी होणाऱ्या व्यक्तींना मदत देण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार महाड येथील तारिक गार्डन ही पाच मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना/वारसांना व जखमी झालेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण यांनी निधी वितरित करण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने शासनाने ६४ लाख रुपये मंजूर करुन हा निधी संबंधितांना वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे.

No comments:
Post a Comment