Sunday, 18 October 2020

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका याेजनेतील महिला लाभार्थी निकषासंबंधी पालकमंत्री आदिती तटकरेंच्या सूचनांचा शासनाकडून स्वीकार !

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका याेजनेतील महिला लाभार्थी निकषासंबंधी पालकमंत्री आदिती तटकरेंच्या सूचनांचा शासनाकडून स्वीकार !
    
     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  रोपवाटिका" या योजनेतील लाभार्थी निवडीसाठी दि. 9 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40 हेक्टर (1 एकर) जमीन असणे आवश्यक, महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य, महिला गटास द्वितीय प्राधान्य हे मुख्य निकष होते. 
       मात्र संवेदनशील, अभ्यासू व  उच्चशिक्षित महिला पालकमंत्री असलेल्या कु.आदिती तटकरे यांनी या निकषांचा सखोल अभ्यास करून शासनाच्या निदर्शनास आणून दिले की, महिलांच्या नावे तसेच महिला बचतगटांच्या नावे शेतजमीन असणे, ही बाब समाजात अजूनही दुरापास्तच आहे. या सूचनेचा सकारात्मक विचारविमर्श करण्यासाठी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे स्वतंत्र बैठक घेण्यात आली आणि पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अभ्यासपूर्ण व वस्तुस्थितीदर्शक सूचनेचे स्वागत करून लाभार्थी निवडीच्या निकषात सुधारणा करण्यात आली. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांनी नुकतेच एक परिपत्रक तात्काळ जारी केले असून या परिपत्रकात महिला कृषी पदवीधारकाच्या मालकीची शेतजमीन या निकषाबाबत महिला कृषी पदवीधारकास स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीऐवजी कुटुंबातील काेणत्याही सदस्याच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक, असा सुधारित बदल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महिला बचतगटातील शेतकऱ्यांनी किमान 0.40 हेक्टर क्षेत्र बचतगटाच्या नावाने भाडेतत्त्वावर घेतलेली असल्यास तो महिला बचतगट या याेजनेचा लाभार्थी होण्यास ग्राह्य धरण्यात यावा, अशा सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत.
           भाजीपाला उत्पादनांना प्रोत्साहन देऊन शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना" राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे प्रत्येक तालुक्यात कीड व रोगमुक्त दर्जेदार रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव असून शासनाकडून पाचशे लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
      अशा प्रकारे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अभ्यासपूर्ण सूचनेमुळे महिला शेतकरी व महिला बचतगटास "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका" योजनेतील लाभार्थी होण्यास माेठी संधी मिळाली आहे.  
        या अनुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला कृषी पदवीधारक शेतकरी तसेच महिला बचतगट यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, जिल्ह्यातील कृषी उत्पादन वाढीस हातभार लावावा, असे आवाहन केले असून जिल्ह्याच्या कृषी घटकांच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...