माणगांव येथे साकारणार ‘मेगा लेदर फूटवेअर ॲण्ड ॲक्सेसरीज क्लस्टर' !!
"चर्मोद्योग व चर्मकारी विकास महामंडळाच्या बैठकीत झाला निर्णय."
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्पांतर्गत "मेगा लेदर फूटवेअर ॲण्ड ॲक्सेसरीज क्लस्टर" ही योजना जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील मौजे रातवड येथे राबविण्याबाबतचा निर्णय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या (लिडकॉम) संचालक मंडळाच्या काल (दि.11फेब्रुवारी राेजी) मंत्रालय येथे संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
त्यानुसार "मेगा लेदर फूटवेअर ॲण्ड ॲक्सेसरीज क्लस्टर" ही योजना मौजे रातवड येथे होण्याच्या अनुषंगाने महामंडळामार्फत या प्रकल्पाबाबत सविस्तर प्रस्ताव शासनास पाठविण्यात येईल. या योजनेसाठी उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने सुमारे 151 एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देण्याबाबत सकारात्मक आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा प्रस्ताव केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यात 82 हजाराहून अधिक चर्मकार समाज वास्तव्यास आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक कुशल कारागीर अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होईल. शिवाय या नियोजित उद्योग प्रकल्पासाठी मुंबई – गोवा महामार्गालगत असलेली ही जागा दळणवळणाच्या सुविधांमुळे भविष्यात ही योजना यशस्वी ठरेल, असा विश्वास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानेही दर्शविला आहे.

No comments:
Post a Comment