म्हारळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांची जिद्द व चिकाटी अखेर यशस्वी, चारवेळा पराभवानंतर पाचव्यांदा विजय !!
कल्याण (संजय कांबळे) : शहाण्या माणसाने राजकारणात पडू नये, किंवा राजकारण हे गजकरण? असे उपहासाने राजकारणाबाबत बोलले जाते. परंतु म्हारळ गावातील एका "पट्याने" एक दोन नव्हे तर चक्क ४ वेळा सलग पराभव झाल्यानंतर ही राजकारणाची खुमखुमी काही केल्या कमी न झाली आणि अखेरीस ५ व्यांदा निवडणूक लडवून म्हारळ ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून विजयश्री खेचून आणली. या अवलियाचे नाव आहे दत्तात्रय सांगळे !
राजकीय जीवन किंवा राजकारणी लोकांबद्दल सर्वसामान्य जनतेचे तसे चांगले मत नाही. याचे कारण म्हणजे बोकाळलेला भ्रष्टाचार, वशिलेबाजी, घराणेशाही, हे होय, निवडणूकीत कार्यकर्ते एकमेकांच्या जिवावर उठतात आणि हे राजकारणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढून ते प्रसिद्धीस देतात, पोलिस केसेस, कोर्ट केसेस, यामुळे राजकारणी जोमात तर कार्यकर्ते कोमात अशी परिस्थिती निर्माण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदर्श गाव चे प्रणेते भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव!
असेच कल्याण तालुक्यातील सर्वात मोठा असणाऱ्या म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये एके काळी भ्रष्टाचार बोकाळला होता. या विरोधात म्हारळ गाव ते शहाड अशी रिक्षा चालवणारे दत् सांगळे यांनी आवाज उठवला. त्यामुळे बरेच रामायण व महाभारत घडले होते. यावेळी आपणही राजकारणात यायला हवे असा विचार करून रिक्षाचालक सांगळे यांनी सन २०१० मध्ये म्हारळ ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. यावेळी अपेनुसार पराभव झाला. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कल्याण पंचायत समितीची २०१२ च्या निवडणुकीत उडी मारली पण तेथेही पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुन्हा एकदा २०१५ च्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी देखील पराभवच झाला. आता मात्र शिवसेना पक्षाने उमेदवारी दिल्याने यावेळी दत्ता सांगळे हे तालुका पंचायत समितीवर जाणार असेच वाटत असतानाच पुन्हा पराभव झाला. त्यामुळे या सततच्या ४ वेळा पराभवानंतर सांगळे राजकारण सोडणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा म्हारळ ग्रामपंचायतीच्या निवडणूक मैदानात सांगळे उतरले.
पण यावेळी मात्र ते स्वतः निवडणूक न लढवता त्यांची पत्नी श्रीमती बेबी दत्तू सांगळे यांना उभे केले. वार्ड क्रमांक ४ड मधून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ग्रामपंचायतीचा कसा भोंगळ कारभार सुरू आहे, कचरा कसा जमा आहे. याचे फोटो काढून त्याचे बॅनर लावले. येथे त्यांच्या पत्नीच्या विरोधात शिवसेना पुरस्कृत निलिमा नंदू म्हात्रे तर भाजपचे वतीने गिता बंडा नांगरे यांनी आव्हान निर्माण केले होते. परंतु जिद्द, चिकाटी, आणि चांगला जनसंपर्क या जोरावर बेबी दत्तू सांगळे या विजयी झाल्या. येथे एकूण २३२७ मतदान झाले यापैकी सौ सांगळे यांना ८६० इतके मतदान झाले होते. त्यामुळे पत्नी मुळे का होईना पण सलग पराभव पत्करलेले श्री सांगळे एकदाचे म्हारळ ग्रामपंचायतीवर विजयी उमेदवार म्हणून ऐटीत गेले.
एक म्हण आहे 'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिशी एक स्त्री असते, पण येथे उलटे म्हणावे लागेल की अयशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री उभी राहिली आहे. असो काही झाले तरी दतू सांगळे यांची जिद, चिकाटी, मेहनत, सातत्य आणि तीव्र महत्त्वाकांक्षा यांचा विजय झाला असून त्यांचे अभिनंदन करायलाच हवे !


No comments:
Post a Comment