Friday 30 April 2021

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०७ हुतात्मे, आंदोलक यांच्या अनमोल योगदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती !!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०७ हुतात्मे, आंदोलक यांच्या अनमोल योगदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती !!


स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी '' संयुक्त महाराष्ट्र चळवळ '' हा ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा लढा उभारण्यात आला होता. तत्कालीन कॉग्रेस नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी चौपाटी येथील सभेत कॉग्रेस जिवंत असेपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही. तर स. का. पाटील यांनी यावचंद्र दिवाकरों म्हणजे सुर्य चंद्र असेपर्यंत किंवा पुढील पाच हजार वर्षे महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही. गुंडगिरी ला योग्य जाब मिळेल. मुंबई केंद्र शासित राहील असे प्रक्षोभक विधान केले. आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन अधिक तीव्र झाले. मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी सत्तेचा गैरवापर करत आंदोलकांना उधळून लावण्यासाठी आंदोलकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आणि एकही गोळी वाया जाणार नाही असा आदेश पोलीसांना देऊन निष्ठूरपणे गोळीबार करायला लावला या संपूर्ण संयुक्त महाराष्ट्र चळवळ आंदोलनात तब्बल १०७ जणांनी आपल्या अनमोल प्राणाची आहुती दिली. या हुतात्म्यांच्या अनमोल योगदानातून आणि सदर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आग्रही भूमिका असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, एस एम जोशी, प्र के अत्रे, लोकशाहिर अणाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर, श्रीपाद डांगे, भाई उद्धवराव पाटील इत्यादींच्या अथक प्रयत्नानंतर १ मे १९६० रोजी अर्थात कामगार दिनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई महाराष्ट्राला मिळाली व भारताच्या नकाशावर  महाराष्ट्र राज्य उदयास आले. 
        महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्या नंतर महाराष्ट्र स्थापनेचा सोहळा ३० एप्रिल १९६० रोजी रात्री ११ : ३० वाजता मुंबई राजभवनाच्या विस्तिर्ण आवारात सुप्रसिद्ध शहनाई वादक रामलाल यांच्या शहनाईच्या मंगल सुरांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य दिव्य अशा अलिशान विचार मंचकाची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी महाराष्ट्राची उत्सवमुद्रा लामणदिवा झळकत होता. 
     ३० एप्रिल च्या रात्री बरोबर १२ वाजता कार्यक्रमाचे उदघाटक देशाचें प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी सर्वांसमोर १ मे १९६० पासून नवं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं अशी अधिकृतपणे घोषणा केली. आणि त्याचक्षणी मुंबई शहरातील सर्व कापड गिरण्यांच्या भोग्यांनी मुंबईचे आसमंत दुमदुमून निघाले. मुंबई शहरातील मंदिर, चर्च आदी प्रार्थना स्थळांतून घंटानाद घणाणू लागले. रेल्वे गाड्यांच्या शिट्यांचा एकच आवाज सुरू झाला. जहाजांचे भोंगे साद देऊ लागले. सदर पूर्व नियोजित ध्वनी संयोजनेतून उद्योग नगरी मुंबईतील विविध घटकांच्या अस्तित्वाचे व सहभागाचे प्रतिक दर्शविण्यात आले. या ऐतिहासिक मंगल कार्यक्रम प्रसंगी मंचकावर अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. 
      सदर कार्यक्रम प्रसंगी राज्यपालांच्या भाषणा नंतर प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंचे भाषण झाले. या नंतर आभार प्रदर्शनाच्या भाषणात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या काळ्या फत्तरातील हा मराठमोळा सदैव तयार राहिल अशी ग्वाही देऊन जवाहरलाल नेहरूंना राष्ट्र कार्यात महाराष्ट्र कार्यरत राहिल अशी ग्वाही दिली. 
      त्याच दिवशी अर्थात १ मे रोजी नवनिर्माण महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मंत्रीमंडळाच्या शपथविधी या कार्यक्रमासाठी मुंबई च्या नव्या सचिवालया समोर भव्य शामियाना उभारण्यात आला होता. या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजता शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. 
     या मध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मंत्रीमंडळ प्रस्थापित झाले ते पुढील प्रमाणे... 
यशवंतराव चव्हाण - ( मुख्यमंत्री, गृह, उद्योग खाते ) बाळासाहेब भारदे ( सहकार मंत्री ) बाळासाहेब देसाई  ( शिक्षण मंत्री ) पी के सावंत ( कृषी मंत्री ) मारोतराव कन्नमवार ( दळणवळण व बांधकाम मंत्री ) वसंतराव नाईक ( महसूल मंत्री ) शेषराव वानखेडे ( अर्थमंत्री ) एस  जी काजी ( पुरवठा मंत्री ) डी झेड पळसपगार ( शहर विकास ) भगवंतराव गाडे  ( ग्रामविकास ) शंकरराव चव्हाण ( वीज पाटबंधारे ) शांतीलाल शहा ( विधी ) ति रा नरवणे ( समाजकल्याण ) जे एच होमी तल्यारखान ( पर्यटन ) असे महाराष्ट्र राज्याचे पहिले मंत्रीमंडळ प्रस्थापित झाले.  *लेखन - पत्रकार विश्वास गायकवाड बोरघर / माणगांव, रायगड भ्रमणध्वनी ८००७२५००१२ / ९८२२५८०२३२*

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...