अनधिकृत बांधकामांना वीज आणि पाणी कनेक्शन नाही - "आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी"
आयुक्तांच्या निर्णयाचे नागरिकांनी केले स्वागत ;
अंमलबजावणी महत्त्वाची !!
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना नळ कनेक्शन आणि वीज कनेक्शन देण्यात येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून बेसुमार अनधिकृत बांधकामे तयार झाले आहेत. अनेक उपाय करून सुद्धा अनधिकृत बांधकामावर नियंत्रण मिळवणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना शक्य होत नव्हते पालिका क्षेत्रात चाळिंबरोबर मोठ्या प्रमाणात आरसीसी पद्धतीच्या चार मजली इमारती तयार होत असल्याने तसेच अनेक वेळा तोडक कारवाई करून सुद्धा पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे तयार होत होते. अनधिकृत बांधकामामुळे अनेक नागरी समस्या निर्माण होत असल्याने तसेच पालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापुढे अनधिकृत बांधकामांना नळ कनेक्शन तसेच वीज कनेक्शन देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच एम एस ई बी ला तातडीने पत्रव्यवहार करून पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना वीजपुरवठा करू नये असे कळविण्यात येणार असल्याचे पत्रकारांना बोलताना आयुक्तांनी सांगितले आहे.
दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे असलेले वीज कनेक्शन आणि पाणी कनेक्शन जर अनधिकृत बांधकामांना दिले गेले नाहीत तर अनधिकृत बांधकाम तयार होणार नाही तसेच अशा अनधिकृत चाळी किंवा इमारतीमध्ये कोणताही नागरिक घर घेणार नाही.आणि नागरिकांनी घर घेतलेच नाही तर अनधिकृत बांधकाम करणारे बांधकाम करणार नाहीत असे आयुक्तांना वाटते.
या निर्णयामुळे अनधिकृत बांधकाम धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची चांगलीच अडचण झाली असून अनधिकृत बांधकामे करणारे चांगलेच कोंडीत अडकले आहेत.
पालिका अधिकाऱ्यांनी या निर्णयाची योग्य अंमलबजावणी केल्यास खरोखरच अनधिकृत बांधकामावर नियंत्रण मिळवणे पालिकेला शक्य होणार आहे आयुक्तांच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असून या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरितीने होणे गरजेचे आहे तसेच या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




No comments:
Post a Comment