ओबीसी समाजाचा विश्वासघात; ठाण्यात भाजपाचे आंदोलन !!
'महाविकास आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा'
ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विश्वासघात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज तीव्र निषेध करीत धिक्काराच्या घोषणा दिल्या. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट नाका येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकीर्दीत राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. मात्र, महाविकास आघाडीकडून महावसुली सुरू असून, ओबीसी व मराठा समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपा ओबीसी जनतेच्या पाठीशी आहे. आगामी निवडणुकीत सर्व जागांवर ओबीसी समाजातील उमेदवार दिले जातील, अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला.
गेल्या सहा महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी आरक्षणासंदर्भांत टोलवाटोलवी सुरू आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा जमा करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वारंवार सुचविले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने काहीही हालचाली केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा जमा करण्यात ढिलाई दाखविले. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय ५ जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत, याकडे आमदार संजय केळकर यांनी लक्ष वेधले.
ओबीसी समाजाच्या पाठीत महाविकास आघाडी सरकारने खंजीर खुपसल्याची ओबीसी समाजाची भावना आहे. त्यातून राज्यभरात भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. त्यात राज्य सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक संजय वाघुले, कृष्णा पाटील, प्रतिभा मढवी, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन केदारी आदी सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment