मुरबाड तालुक्यातील पळू शिंगापूर सह अनेक पर्यटन स्थळांना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट, विकास कामांचा आढावा !!
कल्याण, (संजय कांबळे) : मुरबाड तालुका हा पर्यटन स्थळांंचा तालुका म्हणून ओळखला जातो. येथे अनेक पर्यटक भेटी देत असतात. त्यामुळे या स्थळांची पाहणी, झालेली विकास कामे व अजूनही पर्यटन क्षेत्र विकास करता येईल का? यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका हा पर्यटन स्थळे या करीता प्रसिद्ध आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापूरषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील नाणेघाट, बाबासाहेबांचे आजोळ, तर धगधगते क्रांतिकारक, वीरभाई कोतवाल, हिराजी गोमा पाटील, यांची साक्ष देणारा सिध्दगड, भक्तांना शांती देणारा गोरखगड, आणि या सर्वांना नाहू घालणारा माळशेज घाट अशी कितीतरी पर्यटन स्थळे येथे आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, आदी शहरातून वर्षभर पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात. त्यामुळे या परिसरात शासनाच्या माध्यमातून लाखोंचा निधी मंजूर करून खर्च करण्यात आला आहे, तलाव, घाट, रस्ते, मंदिरे, वनविभागाने केलेली कामे आदी कामाची पाहणी तसेच पर्यटन क्षेत्र विकासासाठी अजूनही काही सुधारणा करता येईल का याची प्रत्यक्षात चाचपणी करण्यासाठी नुकतेच ठाणे जिल्हाधिकारी, राजेश नार्वेकर हे आले होते.
ते प्रथम कुडवली मुरबाड येथे वनविभागाने बांधलेल्या हुतात्मा स्मारकाचे स्थळी गेले. यानंतर मुरबाड दक्षिणेकडे असलेल्या बागेश्वरी तलावास भेट देऊन दायाघाट, माळशेज घाट, येथील स्कायवॉक पाहणी करून दुपारनंतर पळू गावास भेट दिली यावेळी गावातील ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. यानंतर देवगड तिर्थक्षेत्र, शिंगापूर ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या कामाची पाहणी, केली. येथील शंभर टक्के आदिवासी असलेल्या ग्रामपंचायतीला पुरस्कार न मिळाल्याबद्दल या ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे नाराजी व्यक्त केली. यांनतर ते गोरखगड पाहणी करून ठाण्याच्या दिशेने निघून गेले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या समवेत, जिल्हा नियोजन अधिकारी, अमोल खंडारे, उपजिल्हाधिकारी, रोहित रजपूत, उपवनसंरक्षक, गजेंद्र हिरे, मुरबाड तहसीलदार संदीप आवारी, उप अभियंता सत्यजित कांबळे, जिल्हा कामगार मजूर फेडरेशनचे अध्यक्ष, सुहास मोरे, यांच्या सह राहूल मोरे, चेतन मोरे,अशोक मोरे,पळू ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महाले आदी ग्रामस्थ व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पर्यटन स्थळांची व विकास कामाची पाहणी करून जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी समाधान व्यक्त केले असे सुहास मोरे यांनी सांगितले.





No comments:
Post a Comment