आज नवरात्री पासून भाविकांना वणीच्या सप्तशृंगी आईचे मिळणार दर्शन.!!
भिवंडी, दिं,6, अरुण पाटील (कोपर) :
महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी आई ओळखली जाते. अठरा हातांच्या या आईच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येत असतात. तसेच नवरात्र उत्सव काळात पाच लाखांहून अधिक भाविक आईच्या पायाशी नतमस्तक होत असतात. मात्र कोरोना काळात मंदिर बंद असल्याने भाविकांना आईचे दर्शन घेता आले नाही. मात्र नवरात्री पासून सप्तश्रुंगी आईचे दर्शन मिळणार असल्याने भाविकांनमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नासिक पासून 60 किलोमीटर अंतरावर वणी येथील गडावर साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखली जाणारी सप्तशृंगी देवी विराजमान आहे. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे मंदिर पुरातन असून समुद्रसपाटीपासून 4,569 फूट उंचीवर आहे. मंदिरावर जाण्यासाठी नांदूर गावपासून पायी रस्ता आहे. तसेच पायऱ्या सोबत आधुनिक फेनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून काही मिनिटात भाविक थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. या भागात माकडांची मोठी वस्ती आहे. सप्तशृंगी गडाच्या बाजूला शिवतीर्थ शितकडा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम, सूर्यकुंड, कालिका कुंड, जलगुफा, आदी ठिकाणे आहेत.
सप्तश्रुंगी आईची आख्यायिका अशी आहे की, दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतो. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केल्याचेही म्हटले जाते. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजीताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडले होते. तेव्हा हनुमानाने द्रोणागिरी पर्वत नेला. त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच सप्तशृंगी गड म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे अनेक पौराणिक उल्लेख सापडतात. तसेच सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनासाठी आल्याचे इतिहासात संदर्भ आढळतो.
रोज पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीची महापुजा होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यात येऊन, पैठणी अथवा शालू नेसवून साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. तसेच वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. दुपारी बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी साडेसात वाजता शेजारती होते. त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा गावातील मान देशमुख आणि दीक्षित या घरांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर 7 ऑक्टोबरला मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे. मात्र, पास शिवाय कुणालाही मंदिर प्रवेश दिला जाणार नाही. पास मिळविण्यासाठी लशींचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा 72 तसा पूर्वी केलेल्या करोना चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. नवरात्रीत नांदुरी आणि सप्तशृंगी गडावर यात्रा भरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात खासगी वाहनांही गडावर बंदी आहे. गडावर जाण्यासाठी विशेष एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी या एसटी बसने प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No comments:
Post a Comment