आज माणगांव येथे माणगांव तालुका बौध्द समाजातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म विजय शोभा यात्रेचे आयोजन !!
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : बौध्द धम्मा मध्ये अशोक विजया दशमी या दिनाला विशेष महत्व आहे. तथागत गौतम बुध्द यांनी याच दिवशी दसमार सेनेचा पराभव करून मारविजय प्राप्त केला होता व सम्राट अशोकाने याच दिवशी धम्म विजय प्राप्त केला होता. तसेच याच ऐतिहासिक दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली स्वत: बौध्द धम्माची दीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा दिली त्यामुळे हा दिवस बौध्दांसाठी धम्मविजय दिवस आहे.
या दिनाचे औचीत्य साधून आपण माणगांव तालुक्यातील सर्व बौध्द संघटना एकत्र येऊन शुक्रवार दि.15 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत एक विशाल धम्म शांती विजय शोभा यात्रेचे आयोजन केले आहे. या शोभा यात्रेची सुरवात माणगांव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथून वाकडाई नगर, कालवा रोड पर्यंत येऊन तिथे या धम्म विजय शोभायात्रेची सांगता होणार आहे.
या शोभा यात्रेत आपण एक धम्म रथ सजवणार असून त्यावर तथागत भगवान बुध्द, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फुलांनी सजवणार आहोत. आपण सर्व शुभ्र वस्त्र परिधान करून बुध्दं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि! संघम शरणं गच्छामि!! या धम्म सुरात एक शिस्त बध्द वातावरणात आपण हा आपला उत्सव साजरा करणार आहोत.
आज जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे सभा संमेलन घेता येत नाही. मात्र आपण कोवीड 19 प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सर्व सूचनांचे पालन करुन शारीरिक अंतर ठेवून, तोंडाला मास्क लाऊन, शहरातील वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारे अत्यंत शिस्तबद्ध रित्या पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून या धम्म विजय शोभा यात्रेत सहभागी होऊन आपली संस्कृती जपली पाहिजे.
आपली महान विरासत जपण्याबरोबरच तिचा प्रचार आणि प्रसार करणे हे सुध्दा आपले कर्तव्य आहे. म्हणून आपण या शोभा यात्रेचे आयोजन केले आहे. यासाठी आपण आपआपल्या विभागातून, गावागावातून, शेजाऱ्यांना बरोबर घेऊन या शोभा यात्रेत सहभागी व्हायचे आहे.
तसेच आपण कोविड-19 चे सर्व नियम पाळून, तोंडाला मास्क लाऊन या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. जयभीम ! नमोबुध्दाय !!
आपले नम्र ;
"माणगांव तालुका बौध्द समाज व सर्व बुध्द, फुले, शाहू, बहुजनवादी समविचारी संघटना".

No comments:
Post a Comment