Wednesday, 6 October 2021

परतीच्या पावसात भातशेतीच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी कुणबी सेनेने केली मागणी !!

परतीच्या पावसात भातशेतीच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी कुणबी सेनेने केली मागणी !!


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : सध्या स्थितीत सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे  मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तयार झालेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. यासाठी कुणबी सेना मैदानात उतरली असून, उपविभागीय अधिकारी कल्याण, तसेच, मुरबाड तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे  नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


यावेळी कुणबी सेना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा प्रमुख अँड.वैशाली घरत-जगताप, मुरबाड तालुका प्रमुख गुरुनाथ एगडे,दिलीप पष्टे, दिपक तीवार,पतंगराव, रामचंद्र भोईर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर,कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ ,तर कधी दुबार पेरणी,अशी एक ना अनेक संकंटे येत असतात. त्यात गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीत स्वतःला कसा बसा सावरुन  पोटाला हक्काचे दोन घास मिळावेत म्हणून  महागाईत न परवडणारी शेतीही  करत राहिला. गेल्या अनेक पिढ्या ह्या काळया आईची सेवा करून पोटाची खळगी भरत आल्या. वाढती बेरोजगारी आणि गगणाला भिडलेली महागाई या कैचीत सापडलेला शेतकरी शेतीशिवाय कसा जगु शकतो.जगाचा पोशिंदा तो उदार अंतकरणाने ऊन, वारा, आणि पावसाच्या अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड देत शेतीची मशागत, पेरणी, करून उद्या साठी काही नवे उगवेल म्हणून पुन्हा शेतीत उतरतो, यंदा सुरुवातीला पेरणी कोरडीच झाली. पेरलेले बि-बियाणे उगवते कि नाही, या विंवचनेत असताना वरुण राजाने क्रुपा केली. मनासारखा पाऊस झाला. शेतीही वेळेवर लागली. यंदा पिके चांगली येतील.या खुशीत असलेल्या शेतकऱ्याच्या आनंदावर मात्र परतीच्या पावसाने पुर्ण पाणी फेडले. आणि होत्याचे नव्हते झाले. हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा नियतीने हिरावून घेतला. मुसळधार पावसात उभी असलेली भातपिके आडवी झाली. आणि हातात येणारे भातपिक पाण्यात बुडून सडुन गेले. ठाणे जिल्ह्यातील शहापुर आणि मुरबाड तालुका हे दोन तालुके धान्याचे कोठार समजले जातात. परंतु यंदा परतीच्या पावसाने हि कोठारे मात्र रिकामीच राहतील. मग हा शेतकरी कसा जगणार म्हणून शेतकऱ्याला जगवण्यासाठी सरकारने तात्काळ नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत. व दर हेक्टरी शेतकऱ्याला 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी कुणबी सेनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

हायवेवरील ‘देवदूत’ कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाचा रस्त्यावर उतरून संघर्ष !!

हायवेवरील ‘देवदूत’ कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाचा रस्त्यावर उतरून संघर्ष !! उरण दि २८, (विठ्ठल ...