गुहागर तालुका नमन संघटनातर्फे विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह येथे नमन प्रयोगाचे आयोजन !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन (खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ.कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या, भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्रीभ्रुणहत्या, शिक्षणाचे महत्त्व इ. विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
गुहागर तालुका नमन संघटना आयोजित बहुरंगी नमन ,बहुरंगी नमन सोमवार दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी ठीक रात्रौ ८:३० वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह येथे गुहागर तालुका नमन संघटना या तालुका शाखेच्या उन्नती करता आणि तालुक्यातील नमन मंडळांना आणि लोक कलावताना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी,तसेच तालुक्यातील कलावंतांना त्याच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच नमन संघटनेच्या गुहागर तालुका शाखेचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि प्रत्येक गावा- गावात नमन मंडळांना आणि नमन लोक कलावंतांना जागृत करून शासन दरबारी न्याय मिळावा या शुद्ध हेतूने आर्थिक निधी संकलन करण्यासाठी कुणबी वाडी विकास मंडळ असोरे (ता. गुहागर) याचे नमन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नमन या लोकनृत्य मध्ये गणगौळण मध्ये अनेक सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीरायाचा असतो. गणपती पूजन व गणपती गाणे होते. गणेश पुजनात गणेशाची आख्यायिका असते. तरी तालुक्यातील नमन मंडळांना विनंती करण्यात येत आहे की,आपल्या गाव मंडळातील नमन मंडळांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून तालुका शाखेने हाती घेतलेल्या उपक्रमाला सहकार्य करावे. सदर कार्यक्रमाची तिकिटे घेण्यासाठी संघटनेचे खजिनदार उदय दणदणे मोबाईल नंबर- ८२७५६२७६३६ यांच्याशी संपर्क साधावा असे श्री सुधाकर मास्कर (अध्यक्ष) यांनी आव्हान केले आहे.
No comments:
Post a Comment