फाशीला झाला 21 वर्षांचा उशीर, 10 बालकांच्या हत्येतील दोन बहिणींच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर झाले जन्मठेपेत, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय !!
अरूण पाटील, भिवंडी (कोपर) :
रेणुका शिंदे आणि सीमा गावित या दोन बहिणींची 13 मुलांचे अपहरण आणि 10 मुलांची हत्या केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली आहे. न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला विलंब झाल्याचे कारण सांगितले आहे. या दोन बहिणी देशातील पहिल्या अशा महिला होत्या, ज्यांना फाशीची शिक्षा झाली होती .
या दोघींवर निष्पाप मुलांचे अपहरण करून त्यांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करणे, त्यांचा स्वतःच्या सुरक्षेसाठी हत्यार म्हणून वापर करणे आणि हेतू साध्य झाल्यावर त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांची आई अंजनीबाई गावित याही आरोपी होत्या. मात्र, पकडल्यानंतर एका वर्षात तिचा मृत्यू झाला, तर दोन्ही बहिणींना न्यायालयाने 2001 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.मात्र फाशीच्या शिक्षेला 21 वर्ष विलंब झाल्याने त्या शिक्षेचे रूपांतर जन्म ठेपेत झाले आहे.
आई आणि मुलींवर सुमारे 125 गुन्हे दाखल होते. यामध्ये किरकोळ चोरी, पाकिटमार, चेन स्नॅचिंग, गजबजलेल्या ठिकाणी चोरी अशा घटनांचा समावेश होता. पण या महिलांच्या भयावह कथेचा हा एक छोटासा भाग होता. 90 च्या दशकात त्यांनी चोरीनंतर खुनाच्या दुनियेत प्रवेश केला. तेव्हा मोठी मुलगी रेणुका 17 वर्षांची आणि धाकटी मुलगी सीमा 15 वर्षांची होती जेव्हा त्यांनी आपल्या आईसोबत मिळून पहिल्या मुलाची हत्या केली होती.
खरे तर अंजनीबाईंना त्यांच्या पतीने सोडून दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले होते. यानंतर पैसे कमावण्यासाठी अंजनीबाईंनी गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. यामध्ये तिने दोन्ही मुली आणि मोठी मुलगी रेणुकाचा नवरा किरण यांचाही समावेश केला होता. रेणुकाला एक मुलगाही झाला. एक दिवस त्यांनी मंदिरात चोरी केली आणि पकडले गेल्यावर तिने सर्व दोष मुलावर टाकला. लोकांनी दयाळूपणे मुलाला आणि आईला सोडले. यातूनच रेणुका आणि तिची आई व बहिणीला मुलांच्या मदतीने गुन्हे करण्याची कल्पना सुचली.
जून 1990 ते ऑक्टोबर 1996 या सहा वर्षांत या तीन महिलांनी डझनभर मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. अंजनीबाईला सोडून पती मोहनने प्रतिमा नावाच्या महिलेशी विवाह केला. मोहन आणि प्रतिमा यांना दोन मुली होत्या. अंजनीबाई प्रतिमा यांचा इतका द्वेष करत होती की त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला निशाणा बनवले. प्रतिमाला अंजनी आणि तिच्या मुलींवर संशय होता, त्यामुळे तिने तिघींविरुद्ध आपल्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या दाम्पत्याच्या दुसऱ्या मुलीचे अपहरण करण्याचाही तीन गुन्हेगार महिलांचा हेतू होता, परंतु पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. पकडल्यानंतर मुलांचे अपहरण करून त्यांना गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हेगारीच्या दुनियेत मुले मोठी होत होती आणि लोक त्यांना ओळखू लागत होते, तेव्हा या महिला त्यांना मारुन टाकायच्या. खुनाच्या काही कहाण्या अंगावर शहारा आणनाऱ्या होत्या.
संतोष हा अवघा दीड वर्षाचा मुलगा होता. एक दिवशी संध्याकाळी तो बस स्टँडवर रडायला लागला. मुलाच्या रडण्याने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल असे महिलांना वाटल्याने त्यांनी त्याची हत्या केली. जोपर्यंत त्यांच्या हातातच मुलाचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत त्यांनी मुलाचे डोके जमिनीवर आणि लोखंडी रॉडवर आपडले. यानंतर निष्पापाचा मृतदेह ऑटोरिक्षाखाली फेकून देण्यात आला.
त्याचप्रमाणे एका 18 महिन्यांच्या चिमुरडीचीही निर्घृण हत्या करण्यात आली. आधी तिचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत्यूनंतर तिला पर्समध्ये भरून ती पर्स सिनेमा हॉलच्या टॉयलेटच्या शेल्फमध्ये ठेवली.एका 2 वर्षाच्या मुलाला प्रथम अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले आणि नंतर इतके मारले की त्याचा मृत्यू झाला. तो आईची आठवण काढून रडायचा म्हणून त्यांनी हे कृत्य केले होते.
पंकज या तीन वर्षांच्या चुमुकल्याने आजूबाजूच्या लोकांशी बोलण्याचे धाडस केले होते, जेणेकरून तो त्या नरकातून बाहेर पडू शकेल. हा प्रकार समजताच महिलांनी त्याला पंख्याला उलटे लटकवले आणि त्याचे डोके भिंतीवर आपटून त्यांचा खून केला.
या महिला 14 व्या बालकाला आपला शिकार बनवणार होत्या, मात्र त्यापूर्वी पोलिस तिथे पोहोचले. नोव्हेंबर 1996 मध्ये पोलिसांनी तिघांनाही अटक करून तुरुंगात टाकले. तिघींवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. या खटल्यात रेणुकाचा पती मुख्य साक्षीदार झाल्यावर तिच्यावरील सर्व खटले मागे टाकण्यात आले. डिसेंबर 1997 मध्ये, अंजनीबाईंचा अटकेनंतर एका वर्षानंतरच तुरुंगात मृत्यू झाला. तर दोन्ही खुनी बहिणींना 2001 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2004 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही हीच शिक्षा कायम ठेवली होती. मात्र 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. नंतर राष्ट्रपतींनी दोन्ही बहिणींचा दयेचा अर्जही फेटाळला.

No comments:
Post a Comment