मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाने मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळल्या !!
हेमंत रोकडे, डोंबिवली :
ठाणे येथील राबोडी आणि कासारवडवली परिसरातून
मोटारसायकलची चोरी करून पळून गेलेल्या चोरट्याच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्याकडून 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मूळचा आसाम येथील त्रिपुरा येथील रहिवासी असणारा हा आरोपी सध्या कल्याण येथे राहत आहे. डोंबिवली पूर्व येथील काटई नाक्यावर एक अनोळखी इसम संशयास्पद वाटत असल्याची माहिती एका बातमी दाराकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल जरग यांनी तत्काळ कारवाई करत या इसमाची विचारपूस केली. ज्या मोटार सायकलवर तो बसला होता त्या मोटार सायकलचे कागदपत्र मागितल्यानंतर हा अज्ञात इसम गडबडला. त्यानंतर तत्काळ त्याची चौकशी केली असता त्याने ही मोटार सायकल राबोडी परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्याने कासारवाडी पोलीस ठाण्यातून देखील मोटार सायकल चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. या दोन्ही चोरी संदर्भात ठाणे येथील राबोडी पोलीस ठाणे आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे समजल्यानंतर या चोरट्याकडून मुद्देमाल जप्त करत पुढील तपासासाठी राबोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन करमकळ, कवडे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक माळी, पोलीस कॉन्स्टेबल जरग, ईशी यांनी केली.

No comments:
Post a Comment