मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
घाटकोपर पश्चिमेकडील भीमनगर येथील मैदान वाचवण्यासाठी आज शेकडो नागरिकांनी भर पावसात आंदोलन केले. हे मैदान गेल्या ५० वर्षांपासून कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापरात होते. मात्र या ठिकाणी यापूर्वी एस आर ए योजनेतील विकासकाम झाले असून, भविष्यातील कामात कधीही त्यात हे मैदान हडप केले जाण्याची भीती असल्याने हे आंदोलन केल्याची माहिती या आंदोलकांनी दिली.
हे मैदान वाचवण्यासाठी आणि येथे कोणताही पुनर्विकास न होता लोकांना पूर्ववत वापरासाठी राहण्यासाठी गेल्या १५ वर्षापासून येथील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहेत. रहिवाशांना सामाजिक कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र तरीही हे मैदान हडप करण्याचा प्रयत्न होत आहे. या भावनेतून आजचे आंदोलन करण्यात आल्याची माहिती शशी निकाले, भगवान कांबळे, नाना निकम, अमिना खान, सखाराम चाबुस्वार यांनी दिली. तर या ठिकाणी असलेल्या पवार चाळ येथे १९६१ मध्ये जय भवानी विकास मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून आम्ही एकत्र कार्यक्रम करत आहोत. या बाबतची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. त्यामुळे मैदानाचा ताबा आमच्याकडे राहावा आणि हे मैदान वाचवावे यासाठी हे आंदोलन करत आहोत अशी माहिती या आंदोलकांनी दिली.
प्रतिक्रिया,
संजय नेटवटे ( आंदोलक ) : गेल्या चार पिढ्यांपासून हे मैदान अस्तित्वात आहे. त्यात आम्ही सामाजिक, कला, क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करत आहोत. येथे सांस्कृतिक भवन बांधण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे हे मैदान वाचण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे.

No comments:
Post a Comment