अनधिकृत इमारतीच्या लिफ्ट बांधकामाच्या खड्ड्यात पाण्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू !
डोंबिवली, ( शंकर जाधव ) : येथील सांगर्ली मधील एका अनधिकृत बांधकाम ठिकाणी लिफ्टच्या खड्ड्यात पडून पाण्यात बुडून एका ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. हि घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. तर पालिका प्रशासन अश्या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारत नसल्याने दुर्देवी घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत जाधव असे मृत पावलेल्या ६ वर्षीय मुलाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली मधील विघ्नहर्ता इमारतीच्या तळमजल्यावर वेदांत जाधव हा आपल्या परिवारासह राहत होता. सोमवारी रात्रीपासून वेदांतचा शोध सुरु होता.दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास परिसरातील काही जणांना जवळील अनधिकृत इमारतीतील बांधकामाच्या लिफ्ट मधील खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत दिसला. तर खड्ड्याचा पाण्यात एक चेंडू तरंगताना दिसला. आजूबाजूकडील नागरिकांनी याची माहिती वेदांतच्या कुटुंबियांना सांगितल्यावर कुटुंबियांसह नागरिक सदर ठिकाणी धावत गेले. वेदांतला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.मात्र खड्ड्यातील पाण्यात बुडून वेदांतचा मृत्यू झाला होता.या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत आले. वेदांतचा मृतदेह मानपाडा पोलिसांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेला.
वेदांत हा एकुलता एक मुलगा असून तो इमारतीतील सर्वांशी हसत खेळत राहायचा. त्याचे वडील खाजगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतात. दरम्यान या घटनेला जबाबदार असलेल्या सदर इमारतीच्या विकासकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी होत आहे. २०१२ पासून या अनधिकृत इमारतीचे काम सुरू असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.सुरक्षेततेची कोणतीही काळजी न घेतल्याप्रकरणी आणि अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.तर पालिका प्रशासनाचे इतकी वर्षे या इमारतीकडे लक्ष गेले नाही का ? सदर विकासकावर यापूर्वीच गुन्हा का दाखल झाला नाही ? पालिका प्रशासनाने वेळीच सदर इमारत जमीनदोस्त केली असती तर ही घटना टळली असती अशी चर्चा सुरू झाली आहे.
चौकट
घराबाहेर खेळता खेळता बेपत्ता झालेला सात वर्षाच्या अथर्व वारंग या चिमुरड्याचा मृतदेह नजीक असलेल्या एका इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत आढळून आल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. देसलेपाड्यात राहणारा अथर्व वारंग हा २४ मे रोजी खेळता खेळता घराबाहेरून अचानक बेपत्ता झाला होता. घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो न सापडल्याने त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस अथर्वचा शोध घेत असतानाच दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह घराजवळच बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या ड्रेनेज टाकीत आढळला.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण


No comments:
Post a Comment