ठाणे, नवी मुंबई नंतर कल्याण डोंबिवलीत सेनेला धक्का !
ठाणे, बातमीदार : शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाण्यानंतर कल्याण-डोबिंवलीमधील ४५ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. या नगरसेवकांसोबत काही स्थानिक पदाधिकारीदेखील सामिल झाले आहेत. शिवसेनेकडे कल्याण-डोबिंवली महापालिकेत मागाील काही वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.
माजी महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक, महेश गायकवाड, माधुरी काळे, रवी पाटील, डोंबिवली शहरप्रमुख व माजी नगरसेवक राजेश मोरे, उपजिल्हा पमुख राजेश कदम, प्रमोद पिंगळे, विश्वनाथ राणे यांच्यासह नुकत्याच इतर पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक महेश पाटील, नितीन पाटील, रणजित जोशी, विशाल पावशे आदीसह ४५ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ५६ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीत शिवसेना अधिक भक्कम करण्यासाठी इतर पक्षातील नगरसेवकांचा पक्ष प्रवेश एकनाथ शिंदे यांनी घडवून आणला होता. त्यामुळे नगरसेवकांची संख्या ६८ पर्यंत पोहचली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश नगरसेवक आणि नगरसेविका तसेच शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सरकार कटिबद्ध असून, राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment