*गुरू ‘व्यास’ पौर्णिमा.*
आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'गुरुपौर्णिमा.’ व्यासपुजेचा पवित्र दिवस म्हणून गुरुपौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' सुद्धा म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये जन्मदात्या मातापित्यानंतर आदराचे स्थान दिले जाते ते गुरु-आचार्य यांना. 'मातृ देवो भव'... ‘पितृ देवो भव’... याप्रमाणेच ‘आचार्य देवो भव' असे गुरुजनांना देवासारखे वंदनिय स्थान या संस्कृतीने दिले आहे. एवढेच नव्हे तर "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः॥’’ असे म्हणून गुरुला ब्रम्ह-विष्णु-महेश यांच्या म्हणजे जन्मदात्या, पालनकर्त्या, आणि मोक्षदात्या महाशक्तिच्या रूपात वंदन केले आहे.
आपल्याला ज्ञान देणाऱ्या आणि भवसागर तारुन नेणाऱ्या गुरुचे स्मरण, चिंतन, पूजन करून, दान-दक्षिणा देऊन त्यांनी आपल्यावर केलेल्या कृपेबद्दल आपण ऋणी असल्यामुळे आणि आदराची भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्या गुरुकडून आपण विद्या घेतली त्या विद्येबद्दल कृतज्ञता आजच्या दिवशी व्यक्त केली जाते. गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे, गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे. तर आपल्यापाशी असलेले ज्ञान शिष्याला लाभावे अशी ज्याची तळमळ असते. गुरुने शिष्याला एवढे मोठे करावे की, शिष्याने गुरुपेक्षा मोठे व्हावे. ‘शिष्याद् इच्छेत् पराजयम्’ या वचनाप्रमाणे शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु.
या दिवशी संस्कृती घडविणारांचे पूजन होते. हे काम अनेक ऋषी-मुनींनी केले आहे. चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे लिहून जगाला सन्मार्ग दाखविणारे म्हणून महर्षि व्यासांना गुरूंचेही गुरु मानले जाते. व्यास हे सर्व गुरूंचेही परमगुरु. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास महर्षीची पूजा करण्याचा प्रघात आहे. आजच्या दिवशी कोणाही गुरूला केलेला नमस्कार हा महर्षी व्यासांनाच पोहचत असतो. वेद व्यासांनी सर्व विचारांचे संकलन करून, आपल्या संस्कृतीचा ज्ञानकोष समजला जाणारा 'महाभारत' हा ग्रंथ निमार्ण केला. ' भारत: पंचमो वेदः' महाभारताला पाचवा वेद मानला जातो. भगवान श्रीकृष्णानेही "गुरुनां अग्रर्णी गुरु:” किंवा “व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्” आणि व्यासवाणी महाभारताला ‘सारं विश्वस्य’ म्हटले आहे.
ज्या पीठावर बसून केवळ संस्कृतीचा प्रचार व प्रसार करायचा त्या ‘पीठाला’ देखील ‘व्यासपीठ’ असे म्हणतात. ज्या व्यास महर्षींनी भगवद्गीता ग्रंथीत केली ते व्यास विशाल बुद्धीचे होते. बुद्धीचा सागर असलेला गणपती हा व्यासांचा लेखक होता. सांगितलेल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ ध्यानात घेऊन तो गणपतीने तो लिहावा असे बोलणे झाले होते. हे श्लोक किती सुक्ष्म आहेत हे समजून घेण्यासाठी गणपतीला आपले ज्ञानचक्षु देखील सुक्ष्म करावे लागले. ‘देवो उन्मेष-सुक्ष्मेक्षणू, विघ्नराजू’ असा सुक्ष्मार्थ ज्यांना परिचित होता ते महर्षी व्यास.
महर्षी व्यास समाजाचे खरे गुरु होते. म्हणूनच परंपरागत व्यासपूजा ही गुरुपौर्णिमा मानली गेली व व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. संस्कारहीन, जीवनहिन, पशुतुल्य बनलेल्या मानवाला चांगल्या आचार-विचारांकडे नेण्यासाठी कोणत्यातरी जीवंत व्यक्तीची गरज असते. ही व्यक्ती म्हणजे ‘गुरु’ होय. गुरु म्हणजेच जो लघु-लहान नाही तो. जो लघुलाही गुरु बनवितो तो गुरु, जो मनाचा स्वामी बनण्याचा मार्ग दाखवितों, जो स्वत:ला ओळखण्याची दृष्टी देतो तो ‘गुरु’ होय.
गुरुचे अनेक प्रकार आहेत. गुरू कोणत्याही प्रकारातला असला तरी गुरु–शिष्य नाते अतुट आहे. गुरुशिष्याचे नाते हे दोन आत्म्यांचे परस्परांशी असलेले अद्भुत नाते आहे. गुरुशिवाय शिष्याला किंवा शिष्याशिवाय गुरुला योग्य गती मिळत नाही. स्वतःच्या गुरुबाबत स्वाभिमानाने, सन्मानाने आणि गौरवाने बोलणे ही आपली संस्कृती आहे. शाळा–विद्यालयात श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर विनम्र भावनेने नतमस्तक होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूचे दर्शन घेणे, आशीर्वाद घेणे हा आपल्या संपन्न संस्कृतिक परंपरेचा अभिमानाचा भाग आहे.
भारतात थोर गुरुपरंपरा आहे. मी कोणाचा तरी आहे हा मधुरभाव त्यात आहे. हया भावनेत कृतज्ञता आहे. जनकाचे गुरु याज्ञवल्क्य, शुक्राचर्याचे गुरू जनक, सांदिपनीचे शिष्य कृष्ण व सुदामा, विश्वामित्राचे शिष्य राम-लक्ष्मण, धौम्यमुनीचे शिष्य वेद, उपमन्यू व आरुणी, द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुन, परशुरामाचा शिष्य कर्ण, शुक्राचार्यांचे शिष्य कच. आदी थोर गुरु-शिष्य गुरुपरंपरेत होऊन गेले. नाथपरंपरेत आदीनाथांचे शिष्य मत्सेंद्रनाथ, मत्सेंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य गहनीनाथ, गहनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर. इतर संतमंडळीत नामदेवने विसोबा खेचारांना गुरु केले. एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी. समर्थ रामदास स्वामींना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी अनुग्रह दिला तर तुकोबांना बाबाजी चैतन्य यांनी गुरुमंत्र दिला. अशी गुरु-शिष्य परंपरा अद्यापही आपल्या देशात सुरू आहे. अगदी आधुनिक काळात रामकृष्ण परमहंस व विवेकानंद ही गुरू शिष्यांची जोडी होऊन गेली. पाश्चिमात्य संस्कृतीतही गुरुबद्दल अभिमान बाळगला गेला आहे. तत्ववेत्ता सॉक्रेटिस माझा गुरु आहे असे सांगण्यात प्लेटो धन्यता मानत असे. प्लेटो माझा गुरु आहे असे ऑरिस्टॉटल अभिमानाने सांगत असे.
संत कबीर गुरुमहिमा वर्णन करतांना म्हणतात-
‘’गुरू गोविंद दोहू खडे, काके लागो पाय |
बलीहारी गुरू आपने, गोविंद दियो बताय ||’’
गुरु आणि परमेश्वर एकाचवेळी आपल्या समोर आले तर कोणाच्या पाया पडायचे. गुरुनेच तर आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखविला म्हणून “देव सारावे परते, गुरु करावे आरते.”
ज्ञानेश्वर माऊली गुरुचे मोठेपण वर्णन करतांना
ज्ञानेश्वरीत लिहितात –
चित्री सूर्यबिंब काढू येईल चांग, प्रकाशाचे अंग काढता न ये |
ज्ञानदेव म्हणे गुरुकृपा सांग, तरीच हे भाग्य येईल हाता ||
चित्रात सूर्यचे बिंब अगदी छान काढता येईल परंतु त्यातून प्रकाश येणार नाही, परंतु गुरुकृपा झाली तर सूर्याच्या चित्रातून देखील प्रकाश निर्माण करण्याचे भाग्य आपल्या हाती लाभेल.
असा गुरूचा महिमा आगाध आहे. ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर, आणि शांतीचा हिमालय असलेल्या गुरूचे स्मरण, चिंतन, पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे असते. गुरुपूजन म्हणजे सत्याचे पुजन, गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन, गुरुपूजन म्हणजे अनुभवांचे पूजन.
जो जो जयाचा घेतला गुण | तो तो म्या गुरु केला जाण |
गुरुसी आले मोठेपण | जग संपूर्ण गुरु दिसे ||
ज्याचा जो गुण आपण घेतला तो आपला गुरु, मग आई, वडिल शिक्षक कोणीही असो तो आपला गुरु आहे. त्याला कृतज्ञतेने वंदन करण्याचा असा हा व्यासपूजनाचा गुरुगौरवाचा शुभदिवस म्हणजेच 'गुरुपौर्णिमा.'
श्री. दिलीप गणपत खाटेघरे.
जि. प. प्राथमिक शाळा दहिगाव (शे.)
ता. मुरबाड, जि. ठाणे. ९२७०७०११२२.

खूप सुंदर माहिती 👌
ReplyDelete