माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या वतीने श्रावणी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन !
अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ शहराध्यक्ष अरविंद उर्फ अण्णा वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनिषाताई वाळेकर यांच्या वतीने भव्य श्रावणी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेतील गावदेवी खुंटवली रोड येथील शिवम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात सिने अभिनेत्री सिद्धी पाटणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ काढण्यात आले.
यावेळी पारंपारिक वेशभूषा करून महिलांनी मंगळागौरी सणानिमित्त सादर होणाऱ्या पारंपरिक खेळांमध्ये सहभाग घेतला. यावेळी महिला झिम्मा - फुगडी, आगोटा, सासू - सुनेचे भांडण, सासू - नणंदेचे भांडण, ऐटीत नवऱ्याचे नाव घेत उत्साहात थिरकल्या. या उत्सवाच्या निमित्ताने अंबरनाथ मधील वेगवेगळ्या प्रभागामधील मैत्रिणींना एकत्र येण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्व मैत्रिणींनी एकत्र येऊन विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक खेळांमध्ये सहभाग घेतला. पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिलांनी आपल्या पतीराजांचे नाव घेत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या की दरवर्षीप्रमाणे याही वेळी आम्ही आमच्या वतीने मंगळागौरी उत्सवासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. अश्या पवित्र श्रावणातील मंगळागौरीची पूजा ही स्त्रियांसाठी आनंदाची पर्वणीच. शिवसेना शहर शाखेच्या वतीने आम्ही महिला सक्षमीकरण तसेच महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतो. परंतु रोजच्या डेली रूटीन मध्ये महिलांना चूल आणि मूल सांभाळत स्वतःसाठी वेळ मिळत नाही. हे लक्षात घेता त्यांच्यासाठी एक दिवस विरंगुळा तसेच श्रावणी पूजा साजरी करत भव्य मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन केले असल्याचे सांगितले. आयोजित कार्यक्रमात मनीषा वाळेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अंबरनाथ शहरात शिवसेनेच्या वतीने मनीषा ताईंनी केलेल्या त्यांच्या कार्याची पोच पावती प्रत्येक कार्यक्रमात मिळतेच आणि पुढेही नागरिकांच्या हितासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे स्पष्ट प्रतिपादन वाळेकर यांनी केले.

No comments:
Post a Comment