भिवंडी, दिं,११, अरुण पाटील (कोपर) :
राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाने ( State goods and services tax department ) मोठी कारवाई करत बोगस विक्री बिलांच्या कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा भिवंडीत उघडकीस आल्याने शहरातील बड्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे बनावट कंपन्यांच्या नावे जीएसटी सुरू करून १३२ कोटी रुपयांचे इनव्हॉइस जारी केले. त्यानंतर त्याच आधारे २३ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी केंद्रीय जीएसटी विभागाच्या भिवंडी आयुक्त यांच्या कार्यालयाने कारवाई करून अटक केली आहे. हसमुख पटेल असे अटक आरोपीचे नाव आहे.
तपासा दरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे, उपरोक्त आरोपी मास्टर माइंडला CGST कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल ९ सप्टेंबर २०२२ रोजी CGST कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत अटक करण्यात आली.
बनावट कंपन्यांच्या आडून कोणत्याही वस्तूंची प्रत्यक्ष विक्री अथवा सेवा न पुरविता अधिक किमतीची विक्री बिले विविध कंपन्यांना वितरित केल्याची माहिती केंद्रीय जीएसटी भिवंडी कार्यालयाला मिळाली होती.
विशेष म्हणजे केंद्रीय जीएसटी चोरीला आळा घालणाऱ्या प्रतिबंधक शाखेकडून विविध बनावट कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू असताना त्यामध्ये या सर्वांचा मुख्य सूत्रधार हसमुख पटेल असल्याचे समोर आले असून याला न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवाल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाच्या भिवंडी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment