मांजर्ली येथील शेतकऱ्यांच्या बैलाला शॉक लागल्याने मृत्यू, वादळी पावसाने शेतीचेही नुकसान !
कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन ते तीन दिवसापासून कल्याण ग्रामीण भागात पडणाऱ्या मुसळधार वादळी पावसामुळे विजेच्या खांबांची तार तुटल्यामुळे मांजर्ली येथील शेतकरी लक्ष्मण सखाराम गायकर यांच्या बैलाला त्याचा शाँक लागल्याने मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे अनेक शेतातील भात पिके पाण्याखाली गेल्याने तेही मोठे नुकसान होणार आहे.
कल्याण तालुक्यात गेल्या २/३ दिवसापासून मुसळधार वादळी पाऊस पडत आहे. यामुळे जंगलात अनेक विजेचा तारा लोंबकळत आहेत, कित्येक खांब हे जिर्ण झाले असून ते कधीही कोसळण्याच्या तयारीत आहेत, असाच एका लाईटच्या खांबाच्या काही तारा मांजर्ली परिसरात तुटून पडल्या होत्या, गावातील शेतकरी लक्ष्मण सखाराम गायकर हे म्हैशी व बैल चारण्यासाठी गेले होते. संध्याकाळ झाल्याने सगळी जनावरे घरी आली. परंतु त्यांचा लाडका 'गीर, बैल दिसला नाही, त्यामुळे त्यांनी शोध घेतला असता तो गवतात निपचित पडला असल्याचे दिसल्याने लक्ष्मण ने हंबरडा फोडला इच्छा असूनही तो जवळपास जात नव्हता, कारण विजेच्या तारा बैलाच्या पायाला चिकटून बसल्या होत्या.
या गीर बैलांच्या जिवावर तो शेती करत होता, शिवाय काही दिवसापूर्वी याच्या कडूनच शेतीची, नागंरणी, उखळणी, चिखलणी करून भात लावणी केली होती.
आतापर्यंत कल्याण तालुक्यातील उशीद, आपटी, जांभूळ, आदी गावातील शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, बैल, तसेच बक-यांना शॉक लागल्याने कित्येक जनावरांचा जीव गेला आहे.
या पावसामुळे निसावणीला आलेले भात पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे महागाईने शासन जगू देईना तर नैसर्गिक आपत्तीने निसर्ग मरु देईना अशी वाईट अवस्था बळी राजाची झाली आहे.



No comments:
Post a Comment