प्रगती प्रतिष्ठान संस्थेच्या सेवा कार्याचे सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्यपाल भेट देणार !
जव्हार, जितेंद्र मोरघा ;
जव्हार पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या दुर्गम आदिवासी भागात कार्य करणारी प्रगती प्रतिष्ठान संस्था या वर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. दुर्गम भागातील पाड्यांना मूलभूत सेवा सुविधा ते लोकसभागातून स्वयंपूर्ण ग्राम विकास अशी संस्थेच्या कार्याची सुवर्ण महोत्सवी वाटचाल सुरू आहे. स्वर्गीय वसंतराव पटवर्धन यांनी १९७२ मध्ये या संस्थेची स्थापना केली. दुर्गम भागात त्याकाळी आरोग्याच्या मुख्य समस्या होत्या, हे लक्षात घेऊन संस्थेने जव्हार, मोखाडा तालुक्यात साप्ताहिक आरोग्य तपासणी केंद्र सुरू केले. त्यानंतर गावात आरोग्य रक्षक योजना, दाई प्रशिक्षण असे आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात आले. यानंतरच्या काळात आवश्यकता लक्षात घेऊन लोकसभागातून गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी मान्यवर देणगीदाराच्या सहकार्याने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ३५० गावात संस्थने विविध उपक्रम राबवले आहेत. यात प्रामुख्याने नळ पाणी योजना, कृषी विकास , जलसंधारण, सौरग्राम, जव्हार येथे कर्णबधिर मुलांसाठी निवासी शाळा, दिव्यांग पुनर्वसन केंद्र , कौशल्य विकास प्रशिक्षण, प्रगती विद्यार्थी वस्तीग्रह मोखाडा, अशा योजना सुरू आहेत. संस्थेच्या कार्याची दखल विविध मान्यवर संस्था आणि शासनाने घेऊन विविध पुरस्काराने संस्थेचा गौरव केला आहे. यात शासनाचा आदिवासी सेवा संस्था पुरस्कार, राजीव साबळे ग्रामीण विकास पुरस्कार, बाळ कर्वे पुरस्कार यांचा विशेष उल्लेख करता येईल. तत्कालीन राज्यपाल पी.सी अलेक्झांडर, माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, अनिल काकोडकर अशा मान्यवरांनी संस्थेत भेटी दिल्या आहेत. तर दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक स्वर्गीय वसंतराव पटवर्धन यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment